लंडन : न्यूझीलंडविरुद्ध पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या पहिल्या लढतीत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागल्यानंतर आॅस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज, सोमवारी ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध ‘अ’ गटात खेळल्या जाणाऱ्या साखळी लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवण्यास उत्सुक आहे. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यादरम्यान बर्मिंघममध्ये खेळल्या गेलेली लढत पावसामुळे पूर्ण झाली नाही. उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. न्यूझीलंडच्या २९१ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाने पावसाच्या व्यत्ययापर्यंत ९ षटकांत ३ बाद ५३ धावा फटकावल्या होत्या. आॅस्ट्रेलियाला नशिबाची साथ लाभल्यामुळे लढत रद्द झाली. आॅस्ट्रेलियन कर्णधार स्मिथनेही सामन्यानंतर तशी कबुली दिली होती. बांगलादेशची सुरुवातही निराशाजनक झाली. इंग्लंडविरुद्ध सलामी लढतीत बांगलादेशने तमिम इक्बालच्या शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद ३०५ धावांची दमदार मजल मारली होती, पण तरी ते ८ गड्यांनी पराभूत झाले होते.आॅस्ट्रेलिया व बांगलादेश संघांसाठी आता ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण एका पराभवानेही उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशेला धक्का बसू शकतो. स्मिथला त्याची चांगली कल्पना आहे. बांगलादेशविरुद्ध आॅस्ट्रेलिया संघ मोठ्या फरकाने विजय मिळवण्यास प्रयत्नशील आहे, पण स्मिथ अँड कंपनी प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कारण २००५ मध्ये कार्डिफ येथे बांगलादेशविरुद्ध पत्करावा लागलेला पराभव आॅस्ट्रेलिया संघ अद्याप विसरलेला नाही. पहिल्या लढतींमध्ये आॅस्ट्रेलिया व बांगलादेश संघांच्या गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली होती. आॅस्ट्रेलियाच्या स्टार्क, हेजलवूड, कमिन्स व हेस्टिंग्स या गोलंदाजांना न्यूझीलंडविरुद्ध सुरुवातीच्या ४० षटकांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. हेजलवूडने त्यानंतर दमदार पुनरागमन करीत ५२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले, पण कर्णधार स्मिथ गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराज होता. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत जेम्स पॅटिन्सनला संघात स्थान मिळू शकते. बांगलादेश संघाची भिस्त सलामीवीर तमिम इक्बाल, कर्णधार मुशफिकर रहिम, अष्टपैलू शाकिब-अल-हसन आणि वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. तमिम व रहीम यांनी गेल्या लढतीत चांगली गोलंदाजी केली होती तर, शाकिब दोन्ही विभागात अपयशी ठरला होता. मुस्तफिजुरलाही गोलंदाजीमध्ये छाप सोडता आली नव्हती. (वृत्तसंस्था)
बांगलादेश-आॅस्ट्रेलिया महत्त्वपूर्ण लढत आज
By admin | Published: June 05, 2017 4:00 AM