हैदराबाद : फॉर्मात असलेला गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाल, मुंबईचा श्रेयस अय्यर व तमिळनाडूच्या मधल्या फळीतील फलंदाज विजय शंकर यांनी बांगलादेशविरुद्ध सोमवारी अनिर्णीत संपलेल्या दोनदिवसीय सराव सामन्यात भारत ‘अ’ संघातर्फे शतके झळकावित राष्ट्रीय संघासाठी आपली दावेदारी सादर केली.
पांचाल (१०३) व अय्यर (१००) वैयक्तिक शतके झळकावल्यानंतर रिटायर्ड बाद झाले, तर विजय शंकरने नाबाद १०३ धावांची खेळी केली. यांच्या कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने पहिला डाव ८ बाद ४६१ धावसंख्येवर घोषित केला. पहिला डाव ८ बाद २२४ धावसंख्येवर घोषित करणाऱ्या बांगलादेश संघाने सामना संपण्यापूर्वी दुसऱ्या डावात २ बाद ७३ धावांची मजल मारली होती. बागंलादेश संघाला ९ फेब्रुवारीपासून हैदराबादमध्ये भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे, पण त्यांच्या गोलंदाजांसाठी आजचा अनुभव निराशाजनक होता.
भारत ‘अ’ संघाने कालच्या १ बाद ९१ धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. पांचाल व अय्यर यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अय्यरने अपेक्षेनुरुप आक्रमक खेळी करताना ९२ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. त्यानंतर रिटायर्ड बाद झाला. पांचाल व अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी केली. संक्षिप्त धावफलकबांगलादेश पहिला डाव : ८ बाद २२४ आणि दुसरा डाव : १५ षटकांत २ बाद ७३. (तमीम इक्बाल नाबाद ४२, सौम्या सरकार २५. कुलदीप यादव २/२).भारत अ : ८ बाद ४६१ (घोषित). (प्रियांक पांचाल (निवृत्त) १०३, श्रेयस अय्यर (निवृत्त) १००, विजय शंकर नाबाद १०३, एन. सैनी नाबाद ६६. शुभाशीष राय ३/५७, ताइजुल इस्लाम ३/१४१).