ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 10 - भारत आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुस-या दिवशी भारताने वर्चस्व राखले आहे. मुरली विजयने केलेलं शतक आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारत मजबूत स्थितीत आहे.
सुरुवातीला विकेट्स मिळवण्यात यशस्वी झालेल्या बांगलादेशच्या गोलंदाजांना नंतर मात्र कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. भारतीय फलंदाजांवर दबाव आणण्याच्या पुरेपूर प्रयत्नही बांगलादेश गोलंदाजांकडून केला जात आहे. मात्र याचवेळी असा एक क्षण होता ज्याने समलोचकांसहित सर्व प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित करुन सोडलं.
गोलंदाज तैजूल गोलंदाजी करत होता. त्यावेळी समोर कर्णधार विराट कोहली खेळत होता. तैजूलने टाकलेल्या फूल लेंग्थ बॉलला विराट कोहलीने डिफेंड केले. बॉल बॅटच्या मध्यभागी लागल्याचं स्पष्ट कळत आणि दिसत असतानाही बांगलादेशचा कर्णधार मुश्तफिकूर रहिम याने मात्र कहरच केला. शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या खेळाडूशी बोलल्यानंतर त्याने सरळ रिव्ह्यू मागितला. मुश्तफिकूरने रिव्ह्यूची मागणी केल्यानंतर विराट कोहलीला मात्र हसू आवरत नव्हतं, कारण निकाल काय येणार होता हे त्याला चांगलंच माहिती होतं.
अर्थातच विराट कोहलीला नोट आऊट देण्यात आलं. रिप्लेमध्येदेखील बॉल बॅटच्या मध्यभागी लागला असून पॅडपासून फार दूर होता हे स्पष्ट दिसत होतं. कदाचित बॅट पॅडला घासली असल्याने आलेल्या आवाजामुळे कर्णधार मुश्तफिकूर रहिमने रिव्ह्यू घेतला असावा. पण यामुळे त्यांचा एक रिव्ह्यू विनाकारण वाया गेला. भारत मजबूत स्थितीत खेळत असून विराट कोहलीने 150 धावा पुर्ण केल्या आहेत. अजिंक्य रहाणे 82 धावांवर बाद झाला आहे.