ढाका : विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत भारताकडून झालेला पराभव बांगलादेशाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. पराभवानंतर बांगला क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी रान माजवले असतानाच खुद्द पंतप्रधानांनी या वादात उडी घेतली आहे. पंचांच्या कामगिरीवर तीव्र नापंसती व्यक्त करून पंतप्रधान शेख हसिना यांनी ‘बांगलादेशाला कशा पद्धतीने हरविण्यात आले ते सर्वांनी पाहिले,’ असे म्हटले आहे. मेलबोर्न येथे बांगलादेशातील निर्वासितांनी राष्ट्रीय संघासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान हसिना यांनी फोनवर खेळाडूंचे सांत्वन करीत त्यांची पाठदेखील थोपटली. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन तसेच सर्व खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले. हसन यांनी फोनचा लाऊडस्पीकर आॅन केला होता. विश्वचषकात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. ही लय कायम राखा, असे आवाहन करीत त्यांनी मुशर्रफ मुर्तझा व सहकाऱ्यांना पराभवामुळे खचू नका, असेही सांगितले. नंतर बांगलादेश न्यूजशी बोलताना हसिना यांनी ‘निराश होण्याचे काहीच कारण नाही, आम्हाला कशा पद्धतीने हरविण्यात आले, हे सर्वांनी पाहिले. भविष्यात आम्ही नक्की जिंकू,’ या शब्दांत प्रतिक्रिया दिली. (वृत्तसंस्था) पंचांनी चुकीचे निर्णय दिले नसते, तर आम्ही जिंकलो असतो. इन्शाअल्ला, बांगलादेश भविष्यात जिंकेल! एक दिवस विश्व चॅम्पियन बनेल.!- शेख हसिना
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांची मुक्ताफळे
By admin | Published: March 22, 2015 1:19 AM