ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 11 - एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेश संघाला सहज ऑल आऊट करुन भारतीय संघ फॉलो ऑन देईल असं वाटत असताना बांगलादेश फलंदाजांनी मात्र भारतीय गोलंदाजांना कडवी झुंज दिली आहे. 1 बाद 41 धावसंख्येवर आजच्या दिवसाचा खेळ सुरु करणारा बांगलादेश संघ ऑल आऊट होण्यास जास्त वेळ लागणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र तसं न होता, बांगलादेश फलंदाजांनी चिकाटीने फलंदाजी करत दिवसाअखेर 6 विकेट्स गमावत 322 धावा केल्या आहेत. शाकिब हसन आणि कर्णधार मुशफिकूर रहिम यांनी यामध्ये महत्वाचा वाटा उचलला. शाकिबने 82 धावा केल्या तर मुशफिकूर नाबाद 81 धावांवर खेळत आहे.
पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारणा-या भारताने तिस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर बांगलादेशला दोन धक्के दिले. सुरुवातीच्या धक्क्यानंतर शाकीब अल हसन आणि कर्णधार मुशाफीकुर रहीम यांनी बांगलादेशचा डाव सावरला. अजूनही बांगलादेशचा संघ 365 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने पहिल्या डावात 6 बाद 687 धावा केल्या आहेत. उमेश यादवने दोन विकेट्स घेतल्या असून जाडेजा, अश्विन आणि इशांत यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळवण्यात यश मिळालं आहे.
कर्णधार विराट कोहलीने सलग चौथ्या कसोटी मालिकेत चौथे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीविरुद्ध एकमेव कोसटी सामन्यात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ६ बाद ६८७ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला.
भारताने ६ बाद ६८७ धावांची मारलेली मजल विक्रमी ठरली आहे. कारण यापूर्वी कुठल्याही संघाला सलग तीन कसोटी सामन्यांत ६०० धावांच्या पुढे मजल मारता आलेली नाही. यापूर्वी भारताने इंग्लंडविरुद्ध मुंबई व चेन्नई कसोटी सामन्यात ६०० धावांची वेस ओलांडण्याचा पराक्रम केला आहे.
संघात पुनरागमन करीत असलेला यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरविला. साहा याने १५५ चेंडूंना सामोरे जात नाबाद १०६ धावांची खेळी केली. हे त्याचे दुसरे कसोटी शतक ठरले. रिद्धिमान व रवींद्र जडेजा (नाबाद ६०) यांनी सातव्या विकेटसाठी १८८ धावांची अभेद्य भागीदारी केली. अजिंक्य रहाणेने १३३ चेंडूंना सामोरे जाताना ८२ धावा फटकावल्या. रहाणेने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खराब फॉर्म व दुखापतीतून सावरला असल्याचे सिद्ध केले.