- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सर्वार्थाने धक्कादायक ठरली आहे. कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असे एकापेक्षा एक धक्कादायक निकाल यंदाच्या स्पर्धेत लागले आहे. त्यामुळे स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ज्यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते असे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारखे दादा संघ उपांत्य फेरीपूर्वीच रिटर्न तिकीट काढून घरी परतलेत, तर अन्य एका संभाव्य विजेत्याची शिकार करत पाकिस्तानने कुणाच्या ध्यानिमनी नसताना अंतिम फेरी गाठलीय. त्यामुळे आज बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या उपांत्य लढतीपूर्वी भारतीय संघाच्या चाहत्यांची धाकधूक काहीशी वाढलीय. समोर भारत-पाकिस्तान अशा ड्रीम फायनलचं चित्र दिसतंय, पण या चित्राचे रंग बिघडवण्यासाठी मध्येच आलेला बांगलादेशचा संघही दिसतोय.
भारतीय संघाची यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरी श्रीलंकेविरुद्धची लढत वगळता चांगली झालीय. फलंदाजांनी इंग्लंडच्या भूमीत पाय ठेवल्यापासून धावांचा रतीब घातलाय. एरवी तंबूत परतण्याची घाई करणारा धवन खेळपट्टीवर ठाण मांडायचेच, अशी शेंडीला गाठ मारून आल्यासारखा खेळतोय. तर विराट, रोहित, युवराज यांनीही सातत्य राखलेय. श्रीलंकेविरुद्ध खेळताना भरकटलेली गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र योग्य मार्गावर आली. पण इंग्लंडमधल्या लहरी हवामानासारखा आपल्या गोलंदाजांवरही फार विश्वास टाकता येणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेले क्षेत्ररक्षण हुरूप वाढवणारे आहे. एकंदरीत निदान कागदावर तरी विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांगलादेशच्या तुलनेत कैक पटीने सरस आहे. तुलनाच करायची झाली तर विराटसेना पैकीच्या पैकी गुण घेऊन वर्गात अव्वल येईल, असा स्कॉलर विद्यार्थी आहे, तर बांगलादेश नुकताच कुठेतरी 100 पैकी 50 गुण घ्यायला शिकतोय. पण हा विद्यार्थी हुशार आहे, दिवस असेल तर कुणाचंही गणित बिघडवण्यात पटाईत आहे, हे ध्यानात ठेवावं लागेल.
त्यांची या स्पर्धेतली कामगिरी तरी तेच दाखवतेय. त्यांनी इंग्लंडविरुद्ध तीनशेपार मजल मारली होती, तर न्यूझीलंडच्या तोंडातून जवळपास जिंकलेला सामना खेचला होता. बाकी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पावसाने मिळवून दिलेला ग्रेस मार्क त्यांना फायदेशीर ठरला, हेही विसरून चालणार नाही. बाकी त्यांचा इतिहाससुद्धा प्रतिस्पर्ध्याला धोक्याचा इशारा देणारा आहे. 2007 च्या विश्वचषकात त्यांनी आपला खेळ साखळी फेरीतच खल्लास केला होता. तर 2012 च्या आशिया करंडक स्पर्धेत सचिनच्या 100 व्या शतकामुळे ऐतिहासिक झालेल्या लढतीत आपल्याला पराभूत करून त्या ऐतिहासिक दिवसाला गालबोट लावले होते. गेल्यावर्षी ट्वेन्टी-20 विश्वचषकात आपण थोडक्यात बचावलो होतो.
हा असा इतिहास असला तरी बांगलादेशचे आव्हान फार कठीण आहे, अशातला भाग नाही. याच स्पर्धेत झालेल्या सराव सामन्यात आपण त्यांची दाणादाण उडवली होती. आजही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. पण थोडी खबरदारी घ्यावी लागेल. कारण क्रिकेट अंदाजांची गणिते घडवणारा आणि बिघडवणारा खेळ आहे. बाकी आज बांगला वाघांची शिकार केल्यावर रविवारच्या ड्रीम फायनलमध्ये पाकिस्तानचा दुसऱ्यांदा पाडाव करायचा मौका आपल्याला साधायचा आहेच!