बेलग्रेड (सर्बिया) : भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील बजरंगचे हे चौथे पदक ठरले असून या स्पर्धेत चार पदकांची कमाई करणारा तो पहिला भारतीय ठरला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या बजरंगला जागतिक स्पर्धेत ६५ किलो गटाच्या कांस्य पदकाच्या लढतीत कडव्या आव्हानास सामोरे जावे लागले. प्युर्टो रिकोच्या सेबेस्टियन सी. रिव्हेराविरुद्ध ११-९ अशी रोमांचक बाजी मारत बजरंगने भारताला कांस्य मिळवून दिले. उपांत्यपूर्व फेरीत बजरंगला अमेरिकेच्या मायकल डायकोमिहालिस याच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. यानंतर रेपेचेझ फेरीद्वारे कांस्य पदकाच्या लढतीसाठी पात्र ठरताना बजरंगने अर्मेनियाच्या वेझगेन तेवान्यान याचा ७-६ असा पराभव केला होता. जागतिक स्पर्धेत बजरंगचे हे तिसरे कांस्य पदक ठरले. याआधी, त्याने २०१३ आणि २०१९ मध्ये कांस्य पदक पटकावले होते. तसेच, २०१८ साली बजरंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.