माद्रिद: स्टार स्ट्रायकर लोओनेल मेस्सीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने अलवेसला ४-१ असे पराभूत केले. या धमाकेदार विजयासह बार्सोलोनाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत गुणतालिकेत प्रथम स्थान पटकावले. शनिवारी झालेल्या सामन्यात फ्रान्सच्या एंटोनी ग्रीझमॅनने १४ व्या मिनिटाला मेस्सीने दिलेल्या पासवर गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अर्तुरो विडालने ४५ व्या मिनिटाला दुसरा गोल करत बार्सिलोनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दडपणाखाली आलेल्या अलवेस संघासाठी दिलासा मिळवून दिला तो पियरे पोन्स याने. पोन्सने अलवेससाठी गोल केला.
परंतु, सामन्यात हा अलवेस संघाचा एकमेव गोल ठरला. यानंतर पुन्हा एकदा मेस्सीने ६९ व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. त्याचप्रमाणे लुई सुआरेजने शानदार कामगिरी करत ७५ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला आणि या गोलसह बार्सिलोनाचा विजयही निश्चित झाला. आता, पुढील सामन्यात रियाल माद्रिदने जर एटलेटिकोला पराभूत केले, तर त्यांचेही गुण बार्सिलोना एफसी इतकेच ३९ होतील. सेविलने रियाल मालेरकावर २-० असा विजय मिळवला. अलवेस संघाविरुद्ध दणदणीत विजय निश्चित झाल्यानंतर लिओनेल मेस्सी (डावीकडे) एंटोनी ग्रीझमनसोबत आनंद व्यक्त करताना. या शानदार विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.