माद्रिद : युरोपियन चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेत स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी याच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या बार्सिलोनाने शेवटच्या दहा मिनिटांत सामन्याचे पारडे फिरवीत बायेर लिवरकुसेन संघावर २-१ असा रोमहर्षक विजय मिळवीत गटातील अव्वल स्थान कायम राखले. लुईस सुआरेझ याने उत्कृष्ट खेळ करीत संघाला विजयी केले. संपूर्ण सामन्यांत जरी बार्सिलोनाचे वर्चस्व राहिले असले, तरी त्यांना गोल करण्यात अपयश येत होते. पूर्वार्धात लीवरकुसेनच्या किरियाकोस याने सामन्याच्या २२व्या मिनिटाला कॉर्नरवरून मारलेल्या चेंडूला गोल जाळ्याकडे हेडरद्वारे दिशा देत उत्कृष्ट गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. लीवरकुसेन याने ही आघाडी ८० व्या मिनिटापर्यंत टिकविण्यात यश मिळविले. मात्र, त्याच वेळी सुआरेझने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. त्याने लीवरकुसेनच्या गोलजाळ्यात आक्रमण करीत चेंडूला योग्य दिशा दिली; मात्र गोलरक्षकाने चेंडू अडविला. पुन्हा गोलरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. या संधीचा फायदा घेत सर्जी रॉबर्टो याने चपळाईने चेंडू गोल जाळ्यात धाडत संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. या गोलमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या बार्सिलोनाने जोरदार आक्रमण केले. सुवारेझने ८२ व्या मिनिटाला सुरेख मैदानी गोल करीत संघाला २-१ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.(वृत्तसंस्था)
शेवटच्या दहा मिनिटांत बार्सिलोना विजयी
By admin | Published: September 30, 2015 11:25 PM