ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 19 - केरळचा वेगवान गोलंदाज बासिल थम्पी याने मला फार प्रभावित केले. आयपीएलमध्ये तो गुजरात लायन्सचा ‘अनकॅप्ड’ खेळाडू असला तरी लवकरच आंतरराष्टीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो, असा विश्वास वेस्ट इंडिजचा आॅल राऊंडर ड्वेन ब्राव्हो याने व्यक्त केला आहे.
ब्राव्हो म्हणाला,‘गुजरात संघाचा माझा सहकारी गोलंदाज फारच युवाप्रतिभावान खेळाडू आहे. वर्षभरात त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळेल, असा मला विश्वास वाटतो. त्याच्या चेंडूत वेग आणि कलात्मकता आहे. नेहमी नवे शिकण्याची त्याची तयारी देखील असते.’ मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात लायन्सकडून बासिलने यॉर्करचा सातत्याने मारा करीत सर्वांचे लक्ष वेधले. यावर ब्राव्हो म्हणाला,‘बासिल शिकण्यासाठी नेहमी तत्पर असतो. अनेकदा प्रश्न विचारत असतो. भारतीय क्रिकेटमध्ये तो योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे मला वाटते. वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी आणि थम्पी हे १४० किमी प्रतिताशी वेगाने मारा करण्यात सक्षम आहेत. हे सर्व गोलंदाज फारच प्रतिभवान असल्याने मी सर्वांना मोकळ्या मनाने शुभेच्छा देतो.’