राजकोट : विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्यागुजरात लायन्स आयपीएल-१० मध्ये आज रविवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध दोन हात करणार आहे. या लढतीदरम्यान उभय संघांतील फलंदाजांना स्वत:चा ‘दम’ दाखविण्याची संधी असेल. सुरेश रैना, ब्रेंडन मॅक्यूलम आणि अॅरोन फिंचविरुद्ध ग्लेन मॅक्सवेल, हाशिम अमला आणि मार्कस् स्ट्रायनिस अशी चढाओढ राहणार आहे. गुजरातने ईडन गार्डनवर केकेआरला नमविले. कर्णधार रैनाने या सामन्यात ४६ चेंडूत ८४ धावा ठोकल्या. दुसरीकडे पंजाबने मुंबईविरुद्ध १९८ धावा ठोकूनदेखील त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. दोन्ही संघांच्या चिंतेचा विषय गोलंदाजी हाच आहे. उभय संघांतील भारतीय गोलंदाज कुठलीच चमक दाखवू शकले नाही. मोहित शर्मा आणि संदीप शर्मा यांनी मोठ्या प्रमाणावर धावा मोजल्या आहेत. वरुण अॅरोनदेखील काही प्रमाणात महागडा ठरला. अक्षर पटेलने काहीअंशी चांगला मारा केला. गुजरात संघ हॅट्ट्रिकसह सात गडी बाद करणारा अॅन्ड्र्यू टाय याला खेळविण्यास प्राधान्य देणार आहे. रवींद्र जडेजा हा मात्र अद्यापही प्रभाव टाकू शकला नाही. चार सामन्यांत त्याने केवळ एकच गडी बाद केला. प्रवीण कुमारने १०.३२ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. बासिल थम्पीनेदेखील ८.८८ च्या सरासररीने धावा दिल्या आहेत. पण यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता अनेकांच्या पचनी पडली. (वृत्तसंस्था)
गुजरात-पंजाब लढतीत दिसणार ‘फलंदाजांचा दम’
By admin | Published: April 23, 2017 2:49 AM