मेलबोर्न : मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये दहशत पसरविण्यासाठी ‘मानसिक युद्ध’ महत्त्वपूर्ण असते. यासाठी चेंडू आणि शाब्दिक चकमक या दोन्ही आयुधांचा पुरेपूर वापर करावा, असे मत आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने व्यक्त केले आहे. सध्याच्या मालिकेत फलंदाजी, गोलंदाजीत भारताला त्रस्त करणाऱ्या जॉन्सनने ‘मिशेल जॉन्सन : बाऊन्स्ािंग बॅक’ या नव्या डीव्हीडीमध्ये हे मत व्यक्त केले. जॉन्सन म्हणतो, ‘मैदानावर अनेकदा आम्ही निष्फळ गोष्टी अधिक करतो. अनेकदा फलंदाज त्रस्त व्हावा, अशीही कृती करीत असतो. फलंदाजांना त्याचा स्टान्स बदलावा लागेल असे आखूड टप्प्याचे चेंडू टाकतो. क्रिकेट हा डोकेबाज खेळ आहे. कधीकधी टीव्हीवर एकमेकांविरुद्ध युद्ध छेडल्याचे चित्र पाहायला मिळते. याउपर सर्व मर्यादादेखील ओलांडल्या जातात; पण तरीही सर्वच खेळाडू एका मर्यादेत राहण्याचे प्रयत्न करीत असतात.’जॉन्सनची ब्रिस्बेन येथील दुसऱ्या कसोटीदरम्यान भारतीय खेळाडूंसोबत मैदानात खडाजंगी झाली होती. भारतीय खेळाडूंनी चोख प्रत्युत्तर देत जॉन्सनवर शाब्दिक वार केले. जॉन्सनने या सामन्यात पहिल्या डावात ८८ धावा ठोकल्या व चार गडी बाद केले होते. आॅस्ट्रेलियाने हा सामना चार गड्यांनी जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. (वृत्तसंस्था)
फलंदाजांना दहशत हवीच
By admin | Published: December 23, 2014 2:10 AM