ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 13 - आयपीएल १० च्या गुणतक्त्यात सध्या मुंबई इंडियन्स १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. क्वालिफायर १ मध्ये आपले स्थान कायम राखण्यासाठी मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. केकेआर १६ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. रोहित शर्मा आणि संघाने पुणे वगळता इतर सर्वच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले आहे. केकेआरला देखील या आधीच्या सामन्यात पराभूत केले.
मुंबईला या आधीच्या दोन सामन्यात सनरायजर्स आणि पंजाबकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर पंजाबने केकेआरला देखील गेल्या सामन्यात पराभव पत्करायला भाग पाडले होते. गुणतालिकेत आपले वर्चस्व राखण्यासाठी गंभीर आणि शर्मा दोन्ही या सामन्यात आपले कसब पणाला लावतील. दोन्ही संघाचा हा साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना आहे.
मुंबईला उद्याच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी रोहित शर्माला खेळपट्टीवर स्थिरावणे गरजेचे आहे. लेंडल सिमन्स, केरॉन पोलार्ड आणि पार्थिव पटेल हे धावा करत आहेत. मात्र त्यासोबतच युवा नितीश राणा याला देखील आपले कसब दाखवावे लागेल. मागच्या चार ते पाच सामन्यात तो संघासाठी मोठी खेळी करु शकलेला नाही.
तसेच हार्दिक पांड्या फलंदाज म्हणून कसब दाखवत आहे. मात्रगोलंदाजीतही त्याला आपली भेदकता सिद्ध करावी लागेल. मुंबईची गोलंदाजी ही केकेआरपेक्षा मजबूत आहे. कर्ण शर्मा, हरभजन सिंह,कृणाल पांड्या यांच्यासारखे फिरकीपटू आणि जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेघन हे जलदगती गोलंदाज आहेत. मुंबईला फलंदाजीत आणखी मजबूती हवी असल्यास कर्ण शर्मा ऐवजी कृणाल पांड्याला संधी द्यावी लागेल.
कृणालने आपले अष्टपैलुत्व नेहमीच सिद्ध केले आहे.कोलकात्याला आपल्या आघाडीच्या फलंदाजांवर विसंबुन राहण्याची वृत्ती सोडावी लागेल. मुंबईच्या गोलंदाजांसमोर ख्रिस लीन, सुनिल नरेन या पार्टटाईम ओपनर सोबतच गंभीर, उथप्पाचे देखील आव्हान असेल. मनिष पांडे याने देखील स्पर्धेत लक्षवेधी खेळी केली आहे. मुंबईच्या फलंदाजांना कुल्टरनाईल, डी ग्रॅण्डहोम आणि उमेश यादव यांच्यापासून सावध रहावे लागेल.