नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफबाबत बरीच चर्चा सुरू असताना बीसीसीआयने भारतीय संघाच्या व्यवस्थापकपदासाठी अर्ज मागविले आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत २१ जुलै आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) अलीकडेच रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. सपोर्ट स्टाफसाठी जहीर खान व राहुल द्रविड यांच्याकडे वेगवेगळ्या भूमिका सोपविण्यात आल्या आहे, पण सीओएच्या हस्तक्षेपानंतर द्रविड-जहीर यांच्या नियुक्तीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर संघाच्या व्यवस्थापकपदासाठी जाहिरात दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘या पदासाठी इच्छुक असलेले उमदेवार अर्ज करू शकतात.’संघाच्या व्यवस्थापकपदाचा कार्यकाळ किमान एक वर्षाचा राहणार असल्याचे वृत्त आहे. बोर्डाने संघाच्या व्यवस्थापकपदासाठी ज्या अटी ठेवल्या आहेत त्यात चांगल्या पातळीवर क्रिकेट खेळण्याचा अनुभव (आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक पातळी) याचा समावेश आहे. त्याचसोबत उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे, असे बोर्डाला वाटते. त्यामुळे व्यस्त कार्यक्रमासोबत ताळमेळ साधता येईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केले की, बीसीसीआयसोबत संलग्न असलेल्या राज्य संघाचे व्यवस्थापक, राष्ट्रीय संघाचे व्यवस्थापक, स्थानिक किंवा आंतरारष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव, कुठल्याही सरकारी किंवा बिनसरकारी संस्थेमध्ये काम करण्याचा १० वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल. (वृत्तसंस्था)
व्यवस्थापकपदासाठी बीसीसीआयची जाहिरात
By admin | Published: July 17, 2017 12:35 AM