ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ व पीटर हँड्सकोम्ब यांच्याविरुद्ध डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडून मदत मागितल्याच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केलेली तक्रार मागे घेतली आहे. आयसीसीने बुधवारी भारतीय कर्णधार विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही बीसीसीआयने कागदपत्रांसह या घटनेचे व्हीडिओ फुटेज आयसीसीला ई-मेल करत, जागतिक क्रिकेटचे संचालन करणाऱ्या संस्थेच्या आचारसंहितेनुसार लेव्हल दोनचा आरोप निश्चित करण्यास सांगितले होते.
या वादावर तोडगा काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुदरलँड यांनी गुरुवारी बीसीसीआय मुख्यालयात राहुल जोहरी यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही संघाचे कप्तान रांचीमध्ये प्रत्यक्ष भेटून चर्चा करत या वादाला पुर्णविराम देतील असा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वादावर लक्ष केंद्रीत न करता कसोटी मालिकेवर लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.
BCCI & CA have resolved to restore focus on the series amidst increased attention towards issues which emanated in 2nd Test:Joint Statement pic.twitter.com/rKbn67ubqV— ANI (@ANI_news) March 10, 2017
बंगळुरुत झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात पायचीत झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने रिव्ह्यू घेण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे पाहिल्याने वाद सुरु झाला होता. यानंतर स्टीव्ह स्मिथने डीआरएसच्या निर्णयावर रेफरल मागण्याआधी ड्रेसिंग रूमकडे आपण चुकून पाहिल्याचं सांगितलं आहे. तसंच ती आपली घोडचूक असल्याचंही कबूल केलं आहे.
बैठकीत जोहरी आणि सुथरलँड यांच्या खूप वेळ चर्चा झाल्यानंतर सर्व फोकस खेळावर आणि रांचीमधील तिस-या कसोटी सामन्यावर करण्यावर त्यांचं एकमत झालं. 'भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेली कसोटी मालिका दोन्ही संघांमधील चाहत्यांमधील उत्साह वाढवत आहे. मैदानावर दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी असून आपल्या देशाचं अभिमानाने प्रतिनिधित्व करत आहेत. हे बंगळुरुत आपण पाहिलं असून, तणाव वाढू शकतो', असं सुथरलॅड बोलले आहेत.
याआधी स्टीव्ह स्मिथने केलेल्या चुकीवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली होती. एखाद्या देशाला झुकते माप दिले जाते आणि दुसऱ्या देशाला वाऱ्यावर सोडले जाते, अशी भूमिका योग्य नाही, या शब्दांत गावस्कर यांनी आयसीसीला धारेवर धरले.