पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारतीय खेळाडूंसाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यात मोदींनी पदकविजेत्यांसह सर्व खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी त्यांनी खेळाडूंना त्यांचे क्रीडा साहित्य ई-लिलावासाठी देण्यास सांगितले होते आणि त्यातून जमा होणारा निधी गंगा नदीच्या संवर्धनासाठी ( Namami Gange Programme) सुरू केलेल्या नमामी गंगे या प्रकल्पात वापरण्यात येणार आहे. सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्र ( Neeraj Chopra) यानेही त्याचा भाला या उपक्रमासाठी दिला होता आणि BCCI ने १.५ कोटींत तो लिलावात खरेदी केल्याचे वृत्त समोर आले आहे.
PTI ने हे वृत्त दिले आहे. नीरजने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पंतप्रधानांच्या भेटीत भाला भेट म्हणून दिला होता. २०१४मध्ये नमामा गंगे उपक्रमाला सुरुवात झाली होती. सप्टेंबर व ऑक्टोबर २०२१मध्ये खेळाडूंच्या क्रीडा साहित्याचं ई ऑक्शन झालं. ''बीसीसीआयनेनीरज चोप्राच्या भाल्यासाठीची बोली जिंकली. यासह आम्ही अन्य काही गोष्टींवरही बोली लावली आहे. नमामी गंगे हा चांगला उपक्रम आहे आणि देशातील सर्वोच्च क्रीडा संघटना म्हणून यात हातभार लावावा, अशी आमची इच्छा होती. आम्हीही देशासाठी देणे लागतो.''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने PTI ला सांगितले.
बीसीसीआयने कोरोना काळात पंतप्रधान साहाय्यता निधीत ५१ कोटी दिले होते. नीरज चोप्राच्या भाल्यासह बीसीसीआयने भारतीय पॅरालिम्पिय खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले अंगवस्त्र १ कोटींत खरेदी केले. नीरज चोप्राच्या भाल्यावर सर्वाधिक दीड कोटींची यशस्वी बोली लागली, तर तलवारबाज भवानी देवी हिच्या तलवारीला १.२५ कोटी मिळाले, पॅरालिम्पियन सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू सुमित अंतिलच्या भाल्याला १.००२ कोटी मिळाले. बॉक्सर लव्हलिना बोर्गोहाईनच्या ग्लोव्ह्जला ९१ लाखांची यशस्वी बोली लागली.
नीरज चोप्राने नुकतीच त्याचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भाला लुसाने येथील ऑलिम्पिक म्युझियमला दान केला.