मुंबई : यंदाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलिया- न्यूझीलंडमध्ये आयोजित विश्वचषकादरम्यान मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याला संघात अतिरिक्त खेळाडू म्हणून ठेवल्याबद्दल बीसीसीआयने आयसीसीकडे २.४३ कोटी रुपये भरले आहेत. आयसीसीच्या निर्देशानुसार विश्वचषकादरम्यान केवळ १५ सदस्य संघात ठेवण्याची परवानगी असते. त्या वेळी आलेल्या मीडिया वृत्तानुसार भारताने विश्वचषकाआधी झालेल्या तिरंगी मालिकेनंतर वेगवान गोलंदाज कुलकर्णी याला परत न पाठविता संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बोर्डाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ३,७०,१११.९६ डॉलरची रक्कम (६५.९१ रुपये प्रतिडॉलर) अर्थात २ कोटी ४३ लाख ५०३५ रुपये आयसीसीला देण्यात आले. त्यात विश्वचषकादरम्यान अतिरिक्त खेळाडूचा विमानखर्च, निवास, भोजन व इतर खर्चाचा समावेश आहे. बीसीसीआयने याशिवाय आयपीएल २०१५ दरम्यान भ्रष्टाचारविरोधी पथकाची सेवा घेतल्याबद्दल २ कोटी ४९ लाख ५६५०० रुपये खर्च केले. पायाभूत सुविधांवर देण्यात येणाऱ्या सबसिडीसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला ११.२० कोटी आणि कर्नाटक संघटनेला ६७ लाख रुपये दिले. ओडिशा आणि हिमाचल प्रदेश संघटनेला क्रमश: १८ आॅक्टोबर तसेच ९ नोव्हेंबरच्या कार्यकारिणी बैठकीसाठी आठ कोटी ४३ लाख देण्यात आले. आंध्र संघटनेलादेखील इतकीच रक्कम देण्यात आली, तर सौराष्ट्र आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला प्रत्येकी ६ कोटी ७५ लाखांचा निधी देण्यात आला. डीडीसीएला दोन कोटी ८१ लाख रुपये अग्रिम देण्यात आले. निवृत्त झालेला झहीर खान याला २०१४ च्या आयपीएलमधील मानधनात झालेल्या नुकसानीपोटी ८१.१२ लाख रुपये देण्यात आले. हरभजनसिंग, उमेश यादव, अजिंक्य रहाणे, मुरली विजय आणि रोहित शर्मा यांना मॅच फिस तसेच रिटेनर शुल्क देण्यात आले. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना जुलै ते सप्टेंबर २०१५ ला कालावधीसाठी समालोचन शुल्क म्हणून जवळपास ८९ लाख देण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
धवल कुलकर्णीसाठी बीसीसीआयने मोजले दोन कोटी
By admin | Published: December 17, 2015 1:35 AM