ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हे संघाचे गोलंदाजी कोच असतील. याशिवाय राहुल द्रविड यांच्याकडे विशिष्ट परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागाराची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. झहीर आणि राहुल द्रविडच्या माध्यमातून बीसीसीआयनं रवी शास्त्री यांच्यावर अंकुश ठेवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केल्याची चर्चा होती. या सर्व प्रकारानंतरही शास्त्रीच्या मानधनावर त्याचा काहीही परिणाम होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचे प्रशिक्षक या नात्यानं रवी शास्त्री यांना वर्षाकाठी 7 कोटींहून अधिकचं पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयनं रवी शास्त्रींना अशा प्रकारची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदासाठी इतक्याच मानधनाची मागणी केली होती. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं शास्त्रींना वर्षाला 7 कोटींचं पॅकेज देण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शास्त्रींना जास्तीत जास्त साडेसात कोटींपर्यंत मानधन देण्यात येईल, त्यापेक्षा अधिक नसेल, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवर टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे.आणखी वाचा(रवी शास्त्रींची आता भरत अरुण यांच्यासाठी ‘फिल्डिंग’)(रवी शास्त्रींच्या नावाला होता गांगुलीचा ठाम विरोध)(मला आव्हान स्वीकारण्याची सवय - रवी शास्त्री)शास्त्रींसोबत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी नियुक्त केलेल्या प्रशिक्षकांनाही वार्षिक मानधन 2 कोटींपर्यंत देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. या संदर्भातील करारांवर बीसीसीआय शिक्कामोर्तब करणार आहे. राहुल द्रविड हे भारतीय ‘अ’ आणि 19 वर्षांखालील मुलांच्या संघाचेसुद्धा मुख्य मार्गदर्शक आहेत. बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करताना सांगितले, की क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) शिफारशींवर आम्ही शास्त्री यांना मुख्य कोच नेमण्याचा निर्णय घेतला. झहीर खान हे पुढील दोन वर्षांसाठी गोलंदाजी कोच असतील. कोचपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांना माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने कडवे आव्हान दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि कर्णधार विराट कोहली याने आधीही रवी शास्त्री यांना कोच बनवा, असे टि्वट केले होते. त्याची पसंती लक्षात घेऊन शास्त्री यांना झुकते माप देण्यात आले. भारताकडून 2014 मध्ये अखेरचा सामना खेळणारा झहीर खान हा भारताचा सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाज मानला जातो.
>तिसऱ्यांचा टीम इंडियासोबतशास्त्री हे तिसऱ्यांदा टीम इंडियासोबत अधिकारी म्हणून जुळत आहेत. याआधी 2007 मध्ये ते बांगलादेश दौऱ्याच्या वेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. त्यानंतर ऑगस्ट 2014 ते जून 2016 या कालावधीसाठी संघाचे संचालक राहिले. याच काळात भारताने श्रीलंकेला त्यांच्याच देशात पराभूत करीत मालिका जिंकली होती. 2015चा विश्वचषक आणि 2016च्या टी-20 विश्वचषकातदेखील संघाने उपांत्य फेरी गाठली होती.