ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - बीसीसीआयच्या तीन महाव्यवस्थापकांपैकी एक असलेले आर. पी. शाह यांनी शनिवारी वयाचे कारण देत राजीनामा दिला. बोर्डाचे व्यावसायिक हित जोपासणारे अनेक मोठे निर्णय घेण्यात शाह यांचा पुढाकार असायचा. बीसीसीआयची माहिती असलेल्या सूत्रांच्या मते, प्रशासकांच्या समितीची नजर संचालनातील प्रत्येक पैलूंवर असल्यामुळे शाह यांनी राजीनामा दिला असावा.
दुसरीकडे शाह यांनी राजीनामा देण्याचा निर्णय चार महिने आधीच घेतला होता,असे कारण दिले आहे. शाह यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त खरे असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘ मी ६१ वर्षांचा असल्याने पदाचा राजीनामा दिला आहे. आॅक्टोबरमध्येच मी हा निर्णय घेतला होता. मी पुण्यात वास्तव्यास असल्याने नियमितपणे मुंबईचा प्रवास करणे थकवा आणणारा आहे. माझ्यावर कुठलेही दडपण नव्हते किंवा प्रशासकांच्या समितीने तपासही केला नव्हता. सीईओ राहुल जोहरी आणि सीएफओ (मुख्यवित्त अधिकारी)संतोष रांगेकर यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. मी पदावर कायम रहावे अशी जोहरी यांची इच्छा होती पण मी त्यांना पदमुक्त करण्याची विनंती केली. दुसरे महाव्यवस्थापक अमृत माथूर ६० वर्षांचे होताच डिसेंबर २०१६ मध्ये निवृत्त झाले. अशावेळी शाह आणि विकास महाव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी हे ६१ व्या वर्षांत असताना पदावर कायम कसे, असा सवाल उपस्थित होत होता. माथूर म्हणाले,‘ मला इतरांबद्दल माहिती नाही पण माझ्या नियुक्तींमधील अटीनुसार निवृत्तीचे वय ६० वर्षे इतकेच होते. यानुसारच मी डिसेंबर मध्ये सेवानिवृत्त झालो.(वृत्तसंस्था)