नवी दिल्ली : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास संभाव्य गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी प्रशासकांच्या (सीओए) समितीने समज दिल्यानंतरही बीसीसीआयमधील जुने अधिकारी (श्रीनिवासन गट) मात्र माघार घेण्यावर ठाम आहेत.आज रविवारी आयोजित विशेष आमसभेपूर्वी शनिवारी सीओएने राज्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. एसजीएममध्ये देखील माघार घेतल्यास काय परिणाम भोगावे लागतील, यावर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर आणि पूर्व विभागाच्या संघटना स्पर्धेतून माघारीच्या विरोधात आहेत. दुसरीकडे श्रीनिवासन यांचे नियंत्रण असलेल्या दक्षिणेतील संघटना माघारीवर ठाम दिसतात. सौराष्ट्राचे प्रतिनिधी निरंजन शाह यांनी आयसीसीला धडा शिकविण्यासाठी माघार हेच शस्त्र असल्याचे बोलून दाखविले. बैठकीत यावर मतदान झाल्यास बीसीसीआयमध्ये दुफळी माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे, सेनादल आणि भारतीय विश्वविद्यापीठ या संस्थांचा निर्णय शासकीय स्तरावर होतो. काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी संघ ८ मे पर्यंत निवडायचा असल्याची माहिती दिली, त्यावर संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांनी व्यंग करीत मी संयोजक आहे, पण सोमवारपर्यंत संघ निवडायचाय, हे मलाच माहीत नसल्याचे म्हटले. काळजीवाहू अध्यक्षांचे मत चुकीचे नसल्याचे एका पदाधिकाऱ्याचे मत होते. अमिताभ बैठक बोलविणार नसतील तर सीईओ राहुल जोहरी हे एमएसके प्रसाद आणि अन्य निवडकर्त्यांना संघाची घोषणा करण्याचे निर्देश देऊ शकतात, असे हा अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था)
चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघारीवर बीसीसीआयमध्ये दुफळी
By admin | Published: May 07, 2017 12:33 AM