मुंबई : न्या. आर. एम. लोढा यांनी सुचवलेल्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी बीसीसीआय तयार झाली असून, यासंदर्भात १९ फेबु्रवारी रोजी विशेष सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत समितीच्या शिफारशींच्या परिणामाबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.मुंबई क्रिकेट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने या बैठकीची नोटीस मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘या बैठकीत लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत आयसीसीच्या संचालक मंडळाच्या आर्थिक आराखड्याला मान्यता व समितीच्या छत्तीसगडच्या अहवालावरही चर्चा होणार आहे.’’लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत न्यायालयाने केलेल्या टिप्पणीची सावली या बैठकीवर असणार आहे. या शिफारशीमध्ये, मंडळांच्या सदस्यांचा कार्यकाल कमी करणे, एक राज्य एक मत, तसेच राजकीय नेते व शासकीय अधिकाऱ्यांना पदाधिकारी करण्यास प्रतिबंध करण्यासारख्या शिफारशींचा समावेश आहे. या मुद्यावर न्यायालयाला उत्तर देण्यापूर्वी बीसीसीआयच्या विविध समित्यांची मते जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत भारत, आॅस्ट्रेलिया व इंग्लंडला आयसीसीमध्ये व्यापक आर्थिक अधिकार देण्याच्या वादग्रस्त निर्णयावरही चर्चा होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांना हा निर्णय मान्य नसल्याने यावर चर्चा होणार आहे.
लोढा समितीच्या शिफारशींवर बीसीसीआय करणार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 3:28 AM