ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - भारतीय टीम सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यामध्ये व्यस्त आहे, तर बीसीसीआयच्या नजरा संघाच्या खेळासोबतच संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत असून हे स्थान रिक्त होणार आहे. त्यांच्या स्थानी प्रशिक्षकपदासाठी दावेदारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. कुंबळे यांनाही प्रक्रियेमध्ये थेट सहभागी होता येईल तर अन्य दावेदारांमध्ये भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक टॉम मुडी, इंग्लंडचे रिचर्ड पायबस यांचा समावेश आहे, भारताचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश व भारत ‘अ’ संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचाही अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नने बीसीसीआयच्या पदाधिका-यांना बोचणारं वक्तव्य केलं आहे.
मी महागडा आहे माझा खर्च बीसीसीआयला परवडेल असं मला वाटत नाही असं शेन वॉर्न म्हणाला आहे. मिड-डे या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शेन वॉर्नने बीसीसीआयबाबत केलेलं वक्तव्य सर्वांना चकित करणारे आहे. ‘भारतीय क्रिकेट बोर्डाकडे (बीसीसीआय) एवढे पैसे नाहीत की, ते मला भारतीय संघाचा कोच म्हणून नियुक्त करतील", यात काहीही शंका नाही की, मैदानात माझी आणि कर्णधार कोहलीची पार्टनरशीप खूप चांगली झाली असती, पण बीसीसीआयकडे एवढे पैसे नाहीत की मला कोच म्हणून नियुक्त करतील.’असं वॉर्न म्हणाला आहे.
शेन वॉर्न हा जगातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. त्यानं कसोटी आणि वनडेमध्ये मिळून 1000 हून अधिक बळी घेतले आहेत. वॉर्ननं 145 कसोटीत 2.26 च्या सरासरीनं 708 बळी घेतले आहेत. तर 194 कसोटीत 4.25च्या सरासरीनं 293 बळी घेतले आहेत.
दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागसह अन्य सात जणांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत. क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकपदाचा अंतिम निर्णय घेईल. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.