नवी दिल्ली : आयपीएल संचालन परिषदेने गुरुवारी भारतीय क्रिकेटचे पाच दिग्गज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांचा उद््घाटन समारंभादरम्यान सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की,‘भारतीय क्रिकेटमधील पाच दिग्गज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांचा ५ एप्रिल रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या आयपीएलच्या उद््घाटन समारंभादरम्यान सत्कार करण्याचा निर्णय आज बैठकीमध्ये घेण्यात आला.’या पाच खेळाडूंपैकी चार खेळाडूंनी भारताचे कर्णधारपद भूषविले आहे. माजी कर्णधार व सध्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक असलेले अनिल कुंबळे यांचा सत्कार करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश का करण्यात आला नाही, याचे कारण अद्याप कळले नाही. भारतीय क्रिकेटच्या स्वर्णिम युगामध्ये या पाच दिग्गजांसह कुंबळे यांचेही योगदान मोलाचे ठरले आहे. दरम्यान, डायना एडलजी यांच्या विनंतीनंतर माजी भारतीय महिला क्रिकेटपटूंना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महिला खेळाडूंना आयपीएलच्या स्थानिक स्थळांवरील लढतीदरम्यान पुरस्काराचा धनादेश प्रदान करण्यात येईल. (वृत्तसंस्था)
बीसीसीआय करणार ‘फॅब फाईव्ह’चा सत्कार
By admin | Published: March 31, 2017 12:48 AM