नवी दिल्ली : बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआय कार्य समितीची रविवारी मुंबईत बैठक होत असून, तीत आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सला निलंबित करण्यासाठी सदस्य दडपण आणणार नाहीत.बीसीसीआय आणि आयपीएल संचालन परिषदेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथे आॅगस्ट महिन्यात स्थगित करण्यात आलेल्या बैठकीत जो अजेंडा होता तोच या वेळी असेल. यात आयपीएल ९बद्दल कार्यसमूहाने दिलेल्या अहवालावर चर्चा करण्यात येईल. सध्या चेन्नई किंवा राजस्थानला निलंबित करण्याचा विचार नाही. आयपीएल कार्यसमूहाने दोन नव्या संघांवर बोली लावण्याची सूचना केली आहे. ही स्पर्धा ८ संघांची कायम असावी, असा यामागे हेतू आहे. दुसरी सूचना अशी, की चेन्नई आणि राजस्थान यांच्यावरील दोन वर्षांची बंदी संपल्यानंतर पुन्हा लीग १० संघांची करण्यात यावी. लोढा समितीचा अहवाल आज आहे तसा अमलात आणण्याचा निर्णय झाल्याने नव्या शिक्षेबाबत निर्णय घेण्याची गरज नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.बैठकीत तमिळनाडूचे प्रतिनिधित्व पी. एस. रमण हे करतील. पेप्सीने आयपीएल टायटल प्रायोजक म्हणून मागे होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरही चर्चा केली जाईल. श्रीनिवासन हे बैठकीत सहभागी होणार नाहीत. टीएनसीएचे सचिव काशी विश्वनाथ म्हणाले, ‘‘पी. एस. रमण हे आमचे प्रतिनिधी असतील. ते व्यस्त असल्यास अन्य कुणाला पाठविले जाईल. कार्य समितीची ही अखेरची बैठक असून, वार्षिक खात्यांना मंजुरी देण्यात येईल. शिवाय, आमसभेची तारीखही ठरणार आहे. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयची रविवारी बैठक
By admin | Published: October 16, 2015 11:56 PM