नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्य समितीच्या बैठकीमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रमुख म्हणून बोर्डाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीबाबतची बोर्डाची पुनर्विलोकन याचिका मंगळवारी फेटाळली.न्यायमूर्ती तीरथसिंग ठाकूर आणि न्यायमूर्ती एफएमएल कलिफुल्ला यांच्या खंडपीठने सुनावणीदरम्यान बीसीसीआयची पुनर्विलोकन याचिका फेटाळली. बीसीसीआयच्या विशेष आमसभेची बैठक ४ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीत बोर्डाच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्यात येईल.यंदा जानेवारी महिन्यात न्यायालयाने चेन्नई सुपरकिंग्सचे (सीएसके) मालक असल्यामुळे एन. श्रीनिवासन यांचे हितसंबंध गुंतले असल्याचा ठपका ठेवला होता. लोढा समितीनेही आपला अहवाल सादर केला होता. अंतर्गत प्रकरणात न्यायालयाला दखल घेता येणार नाही, असे बोर्डाने म्हटले होते. यापूर्वी जुलैमध्ये लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याची शिफारस केली होती. सीएसकेचे टीम प्रिन्सिपल आणि आयसीसी चेअरमन एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे माजी सहमालक राज कुंद्रा यांचा सट्टेबाजी प्रकरणामध्ये समावेश असल्याचे कारण देत त्यांच्यावर आजीवन बंदी घातली आहे. बीसीसीआयने आपल्या कार्य समितीच्या बैठकीमध्ये माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आलेले संघ सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात कोलकाता येथे आयोजित बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी श्रीनिवासन पोहोचल्यानंतर बोर्डाने बैठक स्थगित केली होती. तमिळनाडू संघटनेचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत सहभागी होण्याचा अधिकार आपल्याला असल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले होते. श्रीनिवासन यांनी बोर्डाच्या बैठकीत सहभागी होण्याबाबत अद्याप न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही, असे बोर्डाने म्हटले होते. सीएसके आणि त्यांची कंपनी इंडिया सिमेंट््सच्या (आयपीएल) भागीदारीबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नसल्याचे बोर्डाने म्हटले होते. सीएसकेमध्ये आपली कुठलीच भागीदारी नसल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आयसीएलने (इंडिया सिमेंट््स लिमिटेड) आपल्या बोर्डाच्या बैठकीमध्ये सीएसकेपासून नाते तोडले होते आणि कंपनीचे नवे नाव चेन्नई सुपरकिंग्स क्रिकेटर्स लिमिटेड केले. (वृत्तसंस्था)
श्रीनिवासनबाबतची बीसीसीआयची याचिका फेटाळली
By admin | Published: September 29, 2015 11:23 PM