ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या भारताचा वेगवान गोलंदाज शांताकुमार श्रीसंतनं खेळावरील घातलेली बंदी उठवण्यासंदर्भातील केलेलं अपील बीसीसीआयनं फेटाळून लावलं आहे. बीसीसीआय कोणताही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असं पत्र लिहून श्रीसंतला कळवलं आहे. श्रीसंतनं 2013च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात लावलेले प्रतिबंध हटवण्यासाठी प्रशासक समिती(सीओए)कडेही अपील केलं होतं. त्यानंतर बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी श्रीसंतला पत्र लिहून बंदी हटवणार नसल्याचं सांगितलं आहे.ते म्हणाले, बीसीसीआयनं सूचित केल्याप्रमाणे श्रीसंतवर आजीवन बंदी कायम राहील आणि त्याला प्रतिस्पर्धी संघात खेळण्यासाठी स्वीकृती नसेल. त्यानं केरळच्या स्थानिक कोर्टातही बंदी हटवण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे, त्यालाही आमचे वकील उत्तर देतील. बीसीसीआयनं भ्रष्टाचारविरोधात शून्य सहिष्णुतेची नीती वापरली आहे. कोणत्याही न्यायालयानं श्रीसंतला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून मुक्त केलेलं नाही. त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कनिष्ठ न्यायालयानं फेटाळून लावला आहे. ब्रिटेनच्या क्लब क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी श्रीसंत प्रयत्नशील असून, त्यासाठी बंदी उठवण्याची मागणी केली आहे. मात्र बीसीसआयनं त्याच्यावरील बंदी उठवण्यास नकार दिला आहे.
बीसीसीआयचा श्रीसंतवरील बंदी उठवण्यास नकार
By admin | Published: April 18, 2017 6:59 PM