ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर माजी संघसंचालक रवी शास्त्री यांची निवड करण्यात आल्याचं वृत्त बीसीसीआयनं खोडून काढलं आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याचे स्पष्टीकरण दिलं आहे. बीसीसीआयनं केलेल्या या खुल्याशामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे. अमिताभ चौधरी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की, प्रशिक्षकपदावर आणखी मोहर लागली नाही. माध्यमातील आलेलं वृत्त खोट आहे. पण आज भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात येणारा प्रशिक्षक आगामी श्रीलंका दौऱ्यापासून ते जबाबदारी स्वीकारणार आहे. आगामी 2019 च्या वर्ल्ड कपपर्यंत त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी असेल.
काल मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्यांनी प्रशिक्षकपदाच्या मुलाखती घेतल्या होत्या. यात रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांच्या समावश होता. सहावा उमेदवार फील सिमन्स अनुपस्थित राहिला. विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते.
काल पत्रकार परिषदेत गांगुलीने आम्हाला आणखी वेळ हवा आहे. कोहलीशी चर्चा केल्यानंतरच प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र आज सकाळी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या(बीसीसीआय) संचालन समितीचीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सीएसी समितीला आज संध्यकाळी प्रशिक्षकची निवड करण्याचे आदेश दिले होते. क्रिकेट सल्लागार समिती म्हणजे सीएसीमध्ये सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या त्रीमुर्तींचा समावेश आहे.