नवी दिल्ली : बीसीसीआयने आगामी ५ आॅगस्ट रोजी मुंबईमध्ये विशेष आमसभा बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. या आमसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुनसार लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. संलग्न राज्य संघटनांच्या सदस्यांना मंगळवारी याबाबत माहिती देण्यात आली. राज्य संघटनेच्या एका सदस्याने याला दुजोरा देताना सांगितले, ‘‘आम्हाला बीसीसीआयचा मेल मिळाला असून ५ आॅगस्ट रोजी मुंबईमध्ये आमसभा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश लागू करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.’’नवी दिल्ली येथे ९ आॅगस्ट रोजी बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांची लोढा समितीसोबत बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी सदस्यांना शिफारशी लागू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने आमसभा बोलाविली आहे. आमसभेतील चर्चेनंतर सदस्यांना येणाऱ्या अडचणी लोढा समितीपुढे मांडता येतील.’’ बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘९ आॅगस्टला लोढा समितीसोबत होणाऱ्या बैठकीपूर्वी राज्य संघटनांना येणाऱ्या अडचणी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वादाचा एक मुद्दा पदाधिकाऱ्यांचा एकूण ९ वर्षांचा कार्यकाळ आहे.’’ आमसभेदरम्यान बीसीसीआयच्या वकिलांची समिती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयची विशेष आमसभा ५ आॅगस्टला मुंबईत
By admin | Published: July 27, 2016 3:51 AM