मुंबई : अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाच्या दिलेल्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर बीसीसीआयच्या सोमवारी होणाऱ्या विशेष आमसभेमध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. आमसभेचा मुख्य अजेंडा ‘एक राज्य, एक मत’ आणि पाच सदस्यीय निवड समिती नियुक्ती हा आहे.कुंबळेचा मुद्दा एजीएमच्या अजेंड्यावर नाही, पण सदस्यांतर्फे हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. एका राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘कुठल्या परिस्थितीमुळे कुंबळे यांना राजीनामा देण्यास बाध्य करण्यात आले, असा प्रश्न कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना सदस्य विचारू शकतात. अजेंड्यावर विषय असणे प्रत्येक वेळी गरजेचे नसते. काही मुद्दे बैठकीच्या अध्यक्षांच्या परवानगीने उपस्थित करता येतात.’राज्य संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी दोन समूहांमध्ये सीओएची भेट घेतली. लोढा शिफारशींबाबत मुद्यावर एकदा चर्चा करण्यात आली. सर्व राज्य संघटनांचे ‘एक राज्य एक मत’ या मुद्यावर समान मतप्रवाह आहे. त्यामुळे नव्या सदस्यांचा समावेश करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त मुंबई, विदर्भ, सौराष्ट्र आणि बडोदा यांचा मताचा अधिकार कायम असावा, याबाबत चर्चा होण्याचे संकेत मिळत आहेत. अन्य मुद्यांमध्ये पाच सदस्यांची निवड समिती नियुक्ती करण्याचा समावेश आहे. कारण स्थानिक क्रिकेटवर तीन सदस्यांना लक्ष ठेवणे अशक्य वाटते. ‘तीन वर्षांचा ब्रेक : कुलिंग आॅफ पिरियड’ हा एक मुद्दा आहे. ही शिफारस लागू करण्यात आली तर बंगाल क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांना ब्रेक घ्यावा लागण्याची शक्यता आहे. काही सदस्य बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन व सचिव निरंजन शाह यांच्यासाठी ७० वर्षांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करू शकतात. दरम्यान, श्रीनिवासन सीओएसोबतच्या पहिल्या समूहाच्या बैठकीदरम्यान उपस्थित होते. अधिकारी पुढे म्हणाले, ‘विनोद राय यांनी आम्हाला सांगितले की, आमसभा सर्वोच्च सभा आहे. या विशेष बैठकीमध्ये योग्य निर्णय घेतले जातील, अशी आशा आहे. श्रीनिवासनही उपस्थित होते, पण त्यांनी केवळ चर्चा ऐकण्यावर भर दिला, मत नोंदविले नाही.’ श्रीनिवासन म्हणाले की, ‘जर मला माझे विचार व्यक्त करायचे असेल तर योग्य व्यासपीठावर व्यक्त करील.’ (वृत्तसंस्था)श्रीनिवासन झाले सहभागी-एन. श्रीनिवासन यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीसोबत (सीओए) विविध राज्य संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या झालेल्या बैठकीमध्ये सहभाग नोंदवला. त्या बैठकीत त्यांनी तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे (टीएनसीए) प्रतिनिधित्व केले. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आज सकाळी १०.४५ वाजता बीसीसीआयच्या मुख्यालयात दाखल झाले आणि बैठकीतून १२.३० वाजता बाहेर पडले. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली नाही. बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह हे सुद्धा श्रीनिवासन यांच्यासोबत बैठकीमध्ये सहभागी झाले होते. भारताचे माजी कर्णधार व बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली दुपारनंतर बैठकीसाठी आले.
बीसीसीआयची विशेष आमसभा आज
By admin | Published: June 26, 2017 1:27 AM