ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - आयसीसीच्या निधीवाटपाच्या मॉडेलमध्ये बीसीसीआयच्या वाट्याला कमी रक्कम येत असल्याने बीसीसीआयने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर आयसीसीने भारताच्या वाट्याला येणाऱ्या रकमेपेक्षा जवळपास 641 कोटी रुपये अधिक रक्कम देण्याची तयारी दाखवली. मात्र बीसीसीआयने उत्पन्नात अधिक वाटा मिळण्याचा आग्रह धरला आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आयसीसीने मंडळासमोर ठेवलेली 39 कोटी डॉलरची ऑफर अद्याप रद्द केलेली नाही. ही रक्कम बीसीसीआयला सुरुवातीला देऊ करण्यात आलेल्या रकमेपेक्षा 10 कोटी डॉलर एवढी अधिक आहे.
आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी दिलेला हा प्रस्ताव बीसीसीआयने सुरुवातीला फेटाळून लावला होता. आसीसीने दिलेला प्रस्ताव आम्ही आमच्या आमसभेसमोर ठेवू, त्यानंतरच हा प्रस्ताव स्वीकारण्याबाबचा निर्णय कळवू, असे आम्ही आयसीसीला कऴवल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र बीसीसीआय किमान 45 कोटी डॉलर एवढी रक्कम मिळावी अशी बीसीसीआयची अपेक्षा आहे. आयसीसी यही अट मान्य करण्यास तयार झाली, तर आम्ही हा प्रस्ताव बीसीसीआयपर्यंत नेऊ आणि सदस्यांना हा प्रस्ताव स्वीकारायला लाऊ, असे आम्ही आयसीसीला सांगितले. पण शशांक मनोहर हे या प्रकरणी कोणतीही तडजोड करण्यास तयार नव्हते.