ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.16- कानपूरमध्ये 22 सप्टेंबरला न्यूझीलंडविरोधातील पहिला कसोटी सामना हा भारतीय संघाचा 500 वा कसोटी सामना असणार आहे. या सामन्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही खास तयारी केली आहे. भारताच्या सर्व माजी कर्णधारांना बीसीसीआयने आमंत्रण दिले आहे. टॉससाठी देखील चांदीचं नाणं तयार केलं जात असून त्यावर 500 वी कसोटी असं लिहिलेलं असणार आहे.
हा दिवस खास बनवण्यासाठी बीसीसीआयने अनेक कार्यक्रम आयोजीत केले आहेत अशी माहिती बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि उत्तरप्रदेश क्रिकेट संघाचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. या सामन्यावेळी सर्व माजी कर्णधारांचा सन्मान कऱण्यत येणार आहे. नारी कांट्रेक्टर, चंदू बोर्डे, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, रवि शास्त्री, सुनील गावसकर, सौरव गांगुली, सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सहवाग, के श्रीकांत, अनिल कुंबळे, राहुल द्रविड हे सर्व माजी क्रिकेटपटू यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मात्र, बीसीसीआय माजी कर्णधार मोहम्मद अजहरूद्दीनला आमंत्रीत करणार नसल्याचं समजतंय. अजहरूद्दीनवर मॅच फिक्सींगप्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून आजीवन बंदी घालण्यात आली होती. न्यायालयाने मात्र या प्रकऱणातून अजहरची सुटका केली होती मात्र तरीही बीसीसीआय अधिकृत कार्यक्रमांना अजहरला आमंत्रीत करत नाही.