ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील एकूण २९ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामने खेळले होते. ज्यूनियर निवड समितीचे प्रमुख वेंकटेश प्रसाद यांच्याकडे ३३ कसोटी आणि १६१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे.
त्यातुलनेत निवड समितीच्या नवीन पाच सदस्यांनी एकत्र मिळून फक्त १३ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद सहा कसोटी आणि १७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांचे सहकारी देवांग गांधी ( ४ कसोटी, ३ एकदिवसीय), शरणदीप सिंग (३ कसोटी, ५ एकदिवसीय), गगन खोडा (२ एकदिवसीय) आणि जतीन परांजपे (४ एकदिवसीय) यांच्याकडे इतक्याच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने निवड समितीमध्ये फक्त तीन सदस्य असावे अशी शिफारस केली होती. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय संघ निवडण्यासाठी बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतका मर्यादीत अनुभव असलेल्या समितीची निवड कशी केली असा प्रश्न पडतो.
वाद टाळण्यासाठी कठोर निकषांचे पालन करुन नव्या सदस्यांची निवड केल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. नव्या निकषानुसार निवड समितीचा सदस्य पाचवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला असला पाहिजे. कुठल्याही आयपीएल संघाशी तो संबंधित नसावा तसेच त्याची स्वत:ची प्रशिक्षण अकादमी नसावी. बीसीसीआयला ९० पेक्षा जास्त अर्ज मिळाले पण त्यात ओळख मिळवलेल्या नावांची संख्या कमी होती. प्रसाद आणि खोडा यापूर्वी निवड समितीच्या पॅनलमध्ये होते.