ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - भारताचा आघाडीचा फलंदाज आणि कसोटी कर्णधार विराट कोहली याचा आज वाढदिवस. ५ नोव्हेंबर १९८८ साली राजधानी दिल्लीत जन्मलेला विराट हा सध्याचा सर्वात यशस्वी खेळाडू गणला जातो. त्याची क्रिकेटमधील आतापर्यंतची कारर्कीद त्याच्या नावाप्रमाणेच विराट अशी आहे. त्याच्या या भन्नाट खेळीवर क्रिकेट जगतातील दिग्गजही फिदा असून सर्वांनीच त्याची 'विराट' स्तुती केली आहे.
> सुनील गावस्कर - एक चांगला खेळाडू होण्यासाठी तुमच्यामध्ये विशेष कौशल्य असणं गरजेचं असते, मात्र एक महान खेळाडू बनण्यासाठी कोहलीसारखा अॅटीट्यूड (दृष्टिकोन)असणेही गरजचे असते.
सर विवियन रिचर्ड्स - मला विराटला खेळताना खूप चांगले वाटते. त्याला खेळताना पाहून मला स्वतःच्या खेळाची आठवण येते.
> सौरव गांगुली - सध्याच्या काळात विराट कोहली जगातला सर्वात महान फलंदाज आहे.
> भारताला वर्ल्डकप मिळवून देण्यात मोठा वाटा बजावणारे माजी प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन हेही कोहलीचे कौतुक करताना थकत नाहीत. विराटमध्ये एक असाधारण प्रतिभा आहे, अशा शब्दांत त्यांनी कोहलीची पाठ थोपटली.
> इयान चॅपेल - ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांच्या मतानुसार, भारताचा हा युवा खेळाडू म्हणजे क्रिकेटमधील 'प्रिन्स' आहे.
> भारताचा अनुभवी गोलंदाज आणि विराटचा संघ सहकारी हरभजन सिंगनेही विराटचे कौतुक केले आहे. ' दबावाखाली विराटचा खेळ अजून उंचावतो. जगात असे फार कमी खेळाडू आहेत, ज्यांना मोठ्या (धावांच्या) आव्हानाचा पाठलाग करायला आवडतं, विराट हा त्यांच्यापैकीच एक आहे' असेही भज्जी म्हणतो.
> ' विराटला खेळताना पाहून मला सचिन तेंडुलकरची आठवण येते' अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने विराटवर स्तुतीसुमने उधळली.
> 'विराट सारख्या खेळाडूला मिळालेले यश पाहून आपण आश्चर्यचकित होणार नाही, पण जर तो अपयशी ठरला तरच आपल्याला धक्का बसेल' अशा शब्दांत संजय मांजरेकरने त्याचे कौतुक केले.
> नासिर हुसैन - इंग्लंडचा माजी कप्तान नासिर हुसैनच्या सांगण्यानुसार, 'सध्याच्या क्रिकेटजगतात सर्वात उमद्या खेळाडूची निवड करायची असले तर मी विराट आणि एबी.डी.व्हिलियर्स या दोघांचे नाव घेईन.'
बातमीखालील कॉमेंटबॉक्समधून तुम्हीही विराटला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...!