- सौरव गांगुली लिहितात...क्रिकेटचा मोठा इतिहासात लाभलेल्या दोन परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत भिन्न दृष्टिकोन राखून सहभागी झाले होते. गतविजेता भारतीय संघ जेतेपद राखण्याचा प्रबळ दावेदार होता. याउलट पाकिस्तान मात्र ‘ब’ गटात सहभागी अन्य एक संघ होता. स्पर्धेसाठी पात्रता मिळवणे त्यांच्यासाठी मोठी बाब होती. त्यामुळे रविवारी दावेदार संघाची ‘डार्क हॉर्स’ संघांसोबत गाठ पडणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूंनाही पाक संघाकडून अंतिम फेरीची अपेक्षा नव्हती. देशभक्त नागरिकांप्रमाणे त्यांनाही पाक संघाने चांगली कामगिरी करावी, असे वाटत होते. पण, सलामी लढतीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाक संघातील तळागाळातील चाहत्याचाही संघावरील विश्वास ढासळला होता. त्यानंतर मात्र प्रत्येक लढतीगणिक पाक संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा होत गेली. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पाक संघाच्या कामगिरीचा आलेख उंचावत गेला. त्यांच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर इंग्लंडविरुद्ध त्यांनी क्षेत्ररक्षणातही कमाल केली. युवा हसनने जुनेद व आमिरच्या साथीने छाप सोडली. आमिरच्या स्थानी इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळलेल्या रईसनेही मिळालेल्या संधीचे सोने केले. सामन्यागणिक सरफराजने कर्णधार म्हणून परिपक्व होत असल्याचे दाखविले. पाक संघासाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांची फलंदाजी आहे. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, यात वाद नाही. त्यांच्यात प्रतिभा आहे, पण केवळ याच एकमेव विभागात पाक संघ भारताच्या तुलनेत थोडा पिछाडीवर आहे. पाकिस्तान संघ भारताविरुद्ध नेहमीच आक्रमक खेळतो, पण प्रतिष्ठेच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळाच्या प्रत्येक विभागात सातत्य राखणे महत्त्वाचे ठरते.प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवित अंतिम फेरीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या संघाविरुद्ध त्यांची लढत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीचा ‘वाईट दिवस’ वगळता भारतीय संघाची या स्पर्धेतील वाटचाल शानदार ठरली आहे. विविधतेच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिलेली नाही. प्रतिस्पर्धी संघाची भागीदारी बहरत असताना चमकदार क्षेत्ररक्षण किंवा कामचलाऊ गोलंदाज कर्णधारचा विश्वास सार्थ ठरवित आहेत. प्रतिस्पर्धी संघाला बुचकाळ्यात टाकणारे निर्णय घेत कर्णधार विराट कोहलीने आपले वेगळेपण जपले आहे. खेळावर नियंत्रण राखण्यात तो यशस्वी ठरला आहे. फलंदाजीमध्ये भारतीय संघ वरचढ आहे. रविवारीच्या लढतीत उभय संघातील खेळाडूंसाठी मनोधैर्य कायम राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ पाकवर वर्चस्व गाजवित आहे. पाक संघावर कुठलेही दडपण नसेल. कारण पराभव झाला तरी ‘खेळाडूंनी चांगली कामगिरी केली’ असेच म्हटले जाईल. निर्भय असा, पण निष्काळजी नको. (गेमप्लॅन)
निर्भय असा, पण निष्काळजी नको
By admin | Published: June 18, 2017 3:13 AM