लॉकडाऊनच्या काळात आजारी वडिलांना सायकलवर बसवून 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्पनं कौतुक केलं. ज्योतीचे वडील ही गुरुग्राममध्ये ई-रिक्षा चालवायचे. मात्र त्याचा अपघात झाला आणि ते जखमी झाले. लॉकडाऊनमध्ये पैसे संपले तसेच घर मालकानंही घर खाली करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे तिने सायकलने प्रवास करायचा असं ठरवलं. ज्योतीने आपल्या आजारी वडिलांना घेऊन बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने एक सायकल देखील खरेदी केली. आजारी वडिलांना घेऊन तिने गुरुग्राममधून सायकलने आपला प्रवास सुरू केला आणि सात दिवसांनी ते त्यांच्या घरी सुखरुप पोहोचले.
इव्हांका ट्रम्पने ट्विट केलं की,'' 15वर्षीय ज्योती कुमारीनं तिच्या आजारी वडिलांना सायकवरून सात दिवस 1200 किमी प्रवास केला. भारतीय लोकांच्या कल्पनाशक्तीनं मला हे सहनशक्ती व प्रेमाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.''
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियानेही ज्योतीला ट्रायलसाठी बोलावलं आहे. फेडरेशनचे अध्यक्ष ओंकार सिंग यांनी सांगितले की,''सकाळीच आमचं तिच्याशी बोलणं झालं आणि लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तिला पुढील महिन्यात आम्ही दिल्लीला बोलावणार आहोत. तिच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि अन्य खर्च आम्हीच करणार आहोत. तिच्यासोबत घरातील कोणी व्यक्ती येत असेल, तर त्यांचाही खर्च आम्ही उचलू. त्यासाठी आम्ही बिहार राज्य सरकारशी चर्चा करत आहोत.''
1200 किमी सायकल चालवणं सोपी गोष्ट नाही. तिच्याकडे ती ताकद आणि शारीरिक सहनशक्ती आहे. त्यामुळे तिची ट्रायल घेतली जाईल आणि तिनं 7-8 टप्पे जरी पार केले, तरी तिची निवड केली जाईल. त्यानंतर तिचा सर्व खर्च आम्ही करू, असेही सिंग यांनी सांगितले.
नशीबाचं चक्र फिरलं; आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योतीसाठी आनंदवार्ता