हैदराबाद : फिटनेसमधील सुधारणा हाच माझ्या यशाचा मूलमंत्र ठरला, असे मत सिंगापूर ओपन आणि थायलंड ग्रॅण्डप्रिक्स स्पर्धेचे पाठोपाठ विजेतेपद पटकविणारा भारतीय बॅडमिंटनपटू सी. साई प्रणीत याने व्यक्त केले आहे. गोपीचंद अकादमीत पत्रकारांशी संवाद साधताना साईप्रणित म्हणाला, ‘चॅम्पियन बनणे नेहमीच सुखद आणि आनंददायी असते. फिटनेसमध्ये सुधारणा केल्यामुळेच मी सिंगापूर आणि थायलंड ओपनचे जेतेपद पाठोपाठ पटकवू शकलो. दोन्ही विजेतेपदांबद्दल मी फारच आनंदी आहे.’मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा खेळात अधिक सुधारणा घडून आली असे वाटते काय, असा सवाल करताच साई म्हणाला, ‘माझ्या फिटनेसचा स्तर फारच उंचावला आहे. जेतेपद मिळविण्यासाठी या गोष्टीची गरज होती. फिटनेस नसेल तर तुम्ही चांगले स्ट्रोक्स मारू शकणार नाहीत. माझ्याकडे प्रतिस्पर्धी खेळाडूला चकित करणारे स्ट्रोक्स आहेत. माझ्या जेतेपदात फिटनेसने मोलाची भूमिका बजावल्याचे माझे मत आहे.’यापुढे देखील फिटनेसकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेत सराव आणि व्यायाम करणार आहे. खेळात फिटनेस नसेल तर चांगला खेळाडू देखील पराभूत होऊ शकतो. अनेकदा तर फिटनेसअभावी सामना अर्ध्यातून सोडून देण्याची वेळ येते. करिअरमधील सर्वोत्कृष्ट टप्प्यावर असल्याचे मला वाटते. पण हा स्तर टिकवून ठेवण्यासाठी आणखी सुधारणा करीत राहणार असल्याचे साई प्रणीतने सांगितले. (वृत्तसंस्था)‘पूर्वीच्या तुलनेत मी आता अधिक फिट झालो आहे. सिंगापूर ओपनआधी मी सहा आठवडे कसून सराव आणि व्यायाम केला. त्यानंतर महिनाभर पुन्हा एकदा व्यायाम करीत दुसऱ्या स्पर्धेसाठी सज्ज झालो होतो. आता माझ्या फिटनेसमध्ये सुधारणा झाल्याने पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक व चपळ खेळू शकतो.’
फिटनेसमुळे चॅम्पियन बनलो : साई प्रणीत
By admin | Published: June 07, 2017 12:42 AM