नवी दिल्ली : देशभरातील तब्बल १५ हजार खेळाडूंचा सहभाग असलेल्या यंदाच्या ६१व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेस शनिवारपासून सुरुवात झाली. नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये येत्या ९ जानेवारीपर्यंत हा क्रीडा मेळावा रंगणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते स्पर्धेचे उद््घाटन झाले. शालेय क्रीडा महासंघाचे अध्यक्ष सतपाल, आॅलिम्पिकवीर सुशीलकुमार या वेळी उपस्थित होते. आशियाई कॅडेट स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पहिलवान नवीन व निकिता यांनी मशाल प्रज्ज्वलित केली. आसामचा १९० सदस्यांचा क्रीडा संघ पथदर्शनासाठी प्रथम मैदानावर उतरला. यजमान दिल्लीच्या ५७९ सदस्यांचे सर्वांत मोठे पथक शेवटी सलामी देण्यासाठी आले. विविध २२ क्रीडाप्रकारांत ही स्पर्धा होत आहे. बेसबॉल, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, फ्लोरबॉल, फुटबॉल, टेनिस, हँडबॉल, जीत कुन डो, जुडो, किक बॉक्सिंग, कुराश, नेटबॉल, दोरीच्या उड्या, स्के मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, टेबल सॉकर, टेबल टेनिस, थांग ता, तेंग शू डो, रस्सीखेच, कुस्ती, योग अशा विविध क्रीडाप्रकारांचा यात समावेश आहे. (वृत्तसंस्था)सहभागी संघाचे पथक या स्पर्धेत महाराष्ट्र ५६८, गुजरात ५४८, पंजाब ५०७, छत्तीसगड ४४०, मध्य प्रदेश ४१२, हरियाना ४०८, उत्तर प्रदेश ३०२, विद्या भारती ४४०, सीबीएसई ३१२, तर चंडीगढच्या २७८ जणांचे पथक सहभागी होत आहे. सर्वांत छोटे पथक नगर हवेलीचे ९ सदस्यांचे आहे. बिहारने २८ व झारखंडचे ८६ सदस्यांचे पथक यात सहभागी होणार आहे. जम्मू-काश्मीरचे २४७, अंदमान-निकोबार येथून ५५ खेळाडू सहभागी होतील. या वेळी तब्बल ४ हजार ८०० अधिकारी उपस्थित असतील.
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2016 1:35 AM