ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना सर्वार्थाने गाजवला तो कर्णधार विराट कोहली आणि घरच्या मैदानावर खेळत असलेला पुणेकर केदार जाधवने. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच पूर्णवेळ कर्णधार म्हणून संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या विराटने पुण्यात विक्रमांची बसरात करत क्रिकेटमधील आपल्या नव्या डावाची दणक्यात सुरुवात केली. विराट आणि भारतीय संघाने या लढतीत नोंदवलेल्या विक्रमांचा संक्षिप्त आढावा..
पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक
विराट कोहलीने याआधी भारताच्या कसोटी संघाचे, तसेच मर्यादित षटकातील संघांचे कर्णधारपद भूषवले होते, पण पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात शतक फटकावण्याची किमया विराटने साधली. त्याने अवध्या 93 चेंडूत शतकी मजल मारली.
धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके ठोकण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
विराट कोहलीची फलंदाजी आव्हानाचा पाठलाग करताना विशेष बहरते. आजही इंग्लंडने दिलेल्या मोठ्या आव्हानासमोर त्याची फलंदाजी बहरली. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना आज पुन्हा एकदा शतकी खेळी केली, धावांचा पाठलाग करतानाचे विराटचे हे 17 वे शतक ठरले. त्याबरोबरच धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरने फटकावलेल्या 17 शतकांच्या विक्रमाशीही विराटने बरोबरी साधली.
पाचव्या गड्यासाठी सर्वात मोठी भागीदारी
351 धावांचा पाठलाग करताना भारताचे चार खंदे फलंदाज झटपट माघारी परतल्यावर विराट कोहलीने केदार जाधवसोबत भारताचा डाव सावरला. विराट आणि केदारने पाचव्या गड्यासाठी 200 धावांची भागीदारी केली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एकदिवसीय सामन्यात पाचव्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ. त्यांनी रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनीने पाचव्या गड्यासाठी केलेल्या 167 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला.
आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना चौथी सर्वात मोठी धावसंख्या
विराट आणि केदारने शानदार शतके फटकावताना केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने 350 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची किमया साधली. भारताने आज फटकावलेल्या 356 धावा आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली चौथी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. याआधी दक्षिण आफ्रिकेने 2006 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 438, त्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 साली दर्बान येथे दुसऱ्या डावात 372 धावा कुटल्या होत्या. तर भारतीय संघाने 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना जयपूर येथे 362 धावा कुटल्या होत्या.