साउथम्पटन : इयान बेलने झळकाविलेल्या कारकीर्दीतील २१ व्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने सोमवारी दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत पहिल्या डावात ५ बाद ४५२ धावांची मजल मारली. बेलने जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले. त्याने त्याचवेळी कसोटी कारकीर्दीत ७ हजार धावांचा टप्पा गाठला. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी १३३ धावांवर नाबाद असेलल्या बेलला पदार्पणाची कसोटी खेळणारा जोस बटलर (१३) साथ देत होता. भारताने दुसऱ्या सत्रात जो रुट (३) आणि मोईन अली (१२) यांना माघारी परतवण्यात यश मिळविले. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार (२-९३) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने उपाहारानंतर आज गोलंदाजांना मोठे स्पेल करण्याची संधी दिली नाही. मोहम्मद शमी (१-१०४), पंकज सिंग (०-११२) आणि भुवनेश्वर कुमार यांना एकापाठोपाठ गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडच्या धावगतीवर अंकुश राखण्यात यश आले. त्यात जो रुट व मोईन अली यांना भुवनेश्वरने तंबूचा मार्ग दाखविला. भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी दुसऱ्या दिवशीही कायम होती. शतकवीर गॅरी बॅलन्स व इयान बेल यांनी चमकदार फलंदाजी करीत इंग्लंडला उपाहारापर्यंत ३ बाद ३५८ धावांची मजल मारुन दिली. कामचलावू फिरकीपटू रोहित शर्माला नशिबाची साथ लाभली. त्याने बॅलेन्सला (१५६) यष्टिपाठी झेल देण्यास भाग पाडले, पण पंचाच्या निर्णयाबाबत साशंकता होती. भारतीय गोलंदाजांना एजिस बाउलच्या पाटा खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यात अपयश आले. उपाहाराला खेळ थांबला त्यावेळी बेल ६८ तर जोर रुट २ धावांवर खेळपट्टीवर होते. बेल व बॅलन्सने तिसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली. इंग्लंडने उपाहारापर्यंत २९ षटकांत १११ धावा वसूल केल्या. इंग्लंडने कालच्या २ बाद २४७ धावसंख्येवरुन पुढे खेळताना बॅलन्स व बेल यांनी सावधगिरी बाळगत फलंदाजी केली. धावफलकइंग्लंड पहिला डाव :- अॅलिस्टर कुक झे. धोनी गो. जडेजा ९५, सॅम रोबसन झे. जडेजा गो. शमी २६, गॅरी बॅलन्स झे. धोनी गो. शर्मा १५६, इयान बेल खेळत आहे १३३, जो रुट झे. धोनी गो. भुवनेश्वर ०३, मोईन अली झे. रहाणे गो. भुवनेश्वर १२, जोस बटलर खेळत आहे १३. अवांतर (१४). एकूण १४५ षटकांत ५ बाद ४५२. बाद क्रम : १-५५, २-२१३, ३-३५५, ४-३७८, ५-४२०. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ३४-१०-९३-२, मोहम्मद शमी ३०-४-१०४-१, पंकज सिंग ३४-८-११२-०, रोहित शर्मा ९-०-२६-१, रविंद्र जडेजा ३६-९-१०१-१, शिखर धवन २-०-४-०.
बेलची शतकी खेळी
By admin | Published: July 29, 2014 6:00 AM