नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग प्रतिभावान खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ ठरले आहे. पण या लीगचे रविवारी संपलेले सत्र स्थानिक प्रतिभावान खेळाडूंसाठी लाभदायक ठरले आहे. एका मोसमात शानदार कामगिरी करताना स्वप्निल असनोडकर, मनप्रीत गोनी व पॉल वॉल्थाटी यांना बघितले. पण दहाव्या पर्वाचे आकलन केले तर हे स्पष्ट होईल, की काही खेळाडू आगामी वर्षामध्ये भारतीय संघाचे बेंच स्ट्रेंथ होऊ शकतात. त्यात केरळचा वेगवान गोलंदाज बासिल थम्पी, दिल्लीचा डावखुरा फलंदाज नितीश राणा आणि महाराष्ट्राचा राहुल त्रिपाठी यांचा समावेश आहे. या त्रिकुटाने यंदाच्या आयपीएलच्या व्यासपीठाचा चांगला उपयोग करून घेतला. युवा वेगवान गोलंदाज थम्पीची कामगिरी त्याच्या आकडेवारीवरून लक्षात येणार नाही. त्याने १२ सामन्यांत प्रतिषटक ९.४९ च्या सरासरीने ११ बळी घेतले. आयपीएल ज्युरीने त्याची उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारासाठी निवड केली. थम्पीने अचूक यॉर्कर टाकण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. त्याने १४० किलोमीटर प्रतितास वेगाने मारा केला. आयपीएल कर्णधार सुरेश रैना व स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो यांनी त्याला भारताच्या संभाव्य खेळाडूंमध्ये स्थान दिले. राष्ट्रीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला चांगले वेगवान गोलंदाज आवडतात आणि थम्पीला वन-डे व टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वेगवान गोलंदाजांच्या राखीव पूलमध्ये स्थान मिळू शकते. गंभीरने रागाने दिल्ली राज्य संघाचे प्रशिक्षक के. पी. भास्कर यांच्यावर टीका करताना ते नितीश राणासारख्या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास संपवीत असल्याचे म्हटले होते. राणाला विजय हजारे करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नव्हती. निराशाजनक कामगिरीमुळे त्याला स्पर्धा संपण्यापूर्वीच घरी पाठविण्यात आले होते. पण या २३ वर्षीय खेळाडूने मुंबई इंडियन्सतर्फे आपली उपयुक्तता सिद्ध करताना १३ सामन्यांत १२६ च्या स्ट्राईक रेटने ३३३ धावा फटकावल्या. राणाने के. पी. भास्कर यांना चुकीचे ठरविले. दरम्यान, स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात त्याला अंबाती रायुडूसाठी जागा सोडावी लागली. पण राणाने मुंबई संघासाठी आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याने या स्पर्धेत १७ षटकार लगावले. राहुल त्रिपाठीने तिसऱ्या लढतीपासून खेळण्यास प्रारंभ केला. स्पर्धेअखेर त्याने १४६ पेक्षा अधिक स्ट्राईक रेट राखताना ३९१ धावा फटकावल्या. बाद फेरीच्या लढतींमध्ये त्याला विशेष छाप सोडता आली नाही. पण स्पर्धेतील त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. भुवीला सलग दुसऱ्या वर्षी पर्पल कॅपचा मानसनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर व वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी आयपीएलच्या दहाव्या पर्वात सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट घेण्यासाठी अनुक्रमे आॅरेंज व पर्पल कॅपचा मान मिळवला. या टी-२० स्पर्धेत १० वर्षांच्या इतिहासात या दोघांनी दुसऱ्यांदा असा पराक्रम केला. भुवनेश्वर कुमारने २०१६ मध्येही २३ बळी घेत स्पर्धेत पर्पल कॅपचा मान मिळवला होता. सलग दोन वर्षे १० लाख रुपयांचा पुरस्कार पटकाविणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. ड्वेन ब्राव्होने चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधित्व करताना दोनदा २०१३ व २०१५ मध्ये पर्पल कॅपचा मान मिळवला होता. भुवनेश्वरने यंदा २६ बळी घेतले. रायझिंग पुणे सुपरजायंटचा जयदेव उनाडकट २४ बळी घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
थम्पी, राणा, त्रिपाठीला लाभ
By admin | Published: May 23, 2017 4:40 AM