विशाखापट्टणम् : बंगाल वॉरियर्स संघाने आपल्या पहिल्याच लढतीत धमाकेदार विजय मिळवताना बलाढ्य तेलगू टायटन्सला २५-१७ असा जबरदस्त धक्का दिला. या पराभवानंतरही २ विजय व २ पराभव, अशा कामगिरीसह ११ गुणांची कमाई करून अग्रस्थान कायम राखले. तर विजयी सलामी दिलेल्या बंगालने ५ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली.घरच्या मैदानावर यंदाच्या सत्रातील अखेरचा सामना खेळत असलेल्या तेलगू टायटन्सकडून विजयाची अपेक्षा होती. मात्र, बंगालने लढवय्या खेळ करताना दुसऱ्या सत्रात संपूर्ण सामनाच फिरवला. सुरुवातीला दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करताना सामन्याची रंगत वाढवली. बचावावर अधिक भर देताना बंगाल व तेलगू यांनी मध्यंतराला ९-९ अशी बरोबरी साधली.यानंतर तेलगू संघाकडून आघाडी घेण्याचे अनेक प्रयत्न झाले; मात्र आक्रमणाच्या नादात चुका झाल्याने बंगालने एकाकी आघाडी घेत हळूहळू सामन्यावर वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. कर्णधार राहुल चौधरी, रोहित बलियान आणि सुकेश हेगडे या अव्वल त्रयींचा बंगालच्या खेळाडूंपुढे दुसऱ्या सत्रात काहीच निभाव लागला नाही. कर्णधार नीलेश शिंदे आणि गिरीश एर्नाक यांनी जबरदस्त पकडी करताना या तिघांच्याही चढायातील हवाच काढली.दुसऱ्या सत्रात तेलगू टायटन्सने आक्रमक सुरुवात करताना ११-९ अशी आघाडी घेत वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, यानंतर बंगालच्या बचावपटूंनी मजबूत पकडी करताना सामन्याचे चित्र पालटले. त्याचवेळी नितीन तोमर आणि महेश गौड यांनी निर्णायक यशस्वी चढाया करून तेलगू टायटन्सवर अतिरीक्त दबाव टाकण्याची जबाबदारी चोखपणे बजावली. ३४व्या मिनिटाला बंगालने तेलगू संघावर लोण चढवून २०-१५ अशी मोठी आघाडी घेतली. यानंतर २२-१५ अशी आघाडी घेत अखेरपर्यंत वर्चस्व राखताना बंगालने तेलगू टायटन्सचा पाडाव केला. (वृत्तसंस्था)
बंगाल वॉरियर्सची धमाकेदार सलामी
By admin | Published: February 03, 2016 3:10 AM