- सचिन कोरडे गोव्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी सरते वर्ष हे संमिश्र यश मिळवून देणारे ठरले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनांवरुन सरकारला धारेवर धरण्यात आले. अशातच सर्वाेत्कृष्ट स्पर्धा आयोजनाचा मान बुद्धिबळाने मिळवला. गोव्यात प्रथमच ग्रॅण्डमास्टर स्पर्धा भरविण्यात आली. यामध्ये २२ आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्सने भाग घेतला होता. ३ हजारांहून अधिक खेळाडू गोव्यात दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या पातळीवर स्पर्धा यशस्वी करुन दाखवत गोवा बुद्धिबळ संघटनेने आपली क्षमता सिद्ध केली. बुद्धिबळची प्रगती पाहता संघटनेचे अध्यक्ष तसेच वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी बुद्धिबळ कॉम्प्लेक्सचाही संकल्प सोडला. अद्यावत असे कुठ्ठाळी येथील हे कॉम्प्लेक्स आता नविन वर्षात पाहता येईल. गोव्याची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी हिने जयपूर येथे राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा मान याच वर्षी मिळवला. भक्तीने यापूवी बºयाच राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. मात्र वरिष्ठ पातळीवर राष्ट्रीय चषक मिळवणरी ती पहिली गोमंतकीय महिला ठरली. या यशानंतर भक्ती भारतीय संघात स्थान निश्चित केले. दुसरीकडे, फिडे मास्टर नितीन बेलूकर यानेही ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत बक्षिसांच्या रांगेत जागा मिळवली. त्याने ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावत वर्षाचा शेवट उत्तम केला. आता तो सुद्धा आशियाई बुद्धिबळ भारताचे प्रतिनिधीत्व करेन. रित्वित परबने याने जम्मू काश्मीर येथील स्पर्धेत शानदार यश मिळवत दुसरा आंतरराष्ट्रीय नॉर्म मिळवला. तन्वी हडकोणकरने १३ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. याशिवाय, ग्रॅण्डमास्टर अनुराग म्हामल, अमेय अवदी, गुंजल चोपडेकर, नीरज सारीपल्ली या खेळाडूंनीही लक्षवेधी कामगिरी केली.
बॅडमिंटन खेळात गोवा प्रगतीपथावर राहिला. यात सर्वात लक्षवेधी कामगिरी ठरली ती तानिषा क्रास्तो हिची. अवघ्या दोन वर्षांत या मुलीने गोव्याकडून प्रतिनिधीत्व करताना सलग सुवर्णपदकांची लयलुट केली. अखिल भारतीय मानांकन स्पर्धेत सब ज्युनियर आणि ज्युनियर गटात सलग दोन सुवर्णपदक पटकावित तानिशाने आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली. आक्टोबर महिन्यात सब ज्युनियर गटात तानिशाने भारतीय संघात स्थान मिळवले होते. लखनउ येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरीत सुवर्ण आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावित तानिशाने वर्षांचा शानदार समारोप केला. गोव्याची अव्वल मानांकित अनूरा प्रभुदेसाई हिने सुद्धा वर्ष गाजवले. मानांकनात अव्वल स्थान कायम राखत अनुराने पदके प्राप्त केली. पीबीएल या व्यावसयिक स्पर्धेत सायना, सिंधूसारख्या दिग्गाजांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत खेळणारी अनुरा एकमेव गोमंतकीय आहे. त्यामुळे ही स्पर्धा तिच्या कारकीदीसाठी बुस्ट देणारी ठरेल. अनुराला रेल्वेतही क्रीडा कोट्यातून नोकरी मिळाली.
फुटबॉल क्षेत्रात मैदानापेक्षा मैदानाबाहेरील कामगिरीकडे लक्ष अधिक होते. कारण गोवा फुटबॉल संघटनेची निवडणूक जितकी वादग्रस्त राहिली तितकीच ती गाजली सुद्धा. अखेरच्या क्षणापर्यंत चर्चिल आलेमाव आणि आवेर्तान फुर्तादो यांच्या चुरस पाहायला मिळाली.मात्र बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव शतकीय मतांनी जिंकले आणि जीएफएचे बिग बॉस ठरले. ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती. राजकीय निवडणुकीपेक्षाही अधिक कष्ट देणारी आणि घाम फोडणारी ही निवडणुक होती, असे चर्चिल यांनी स्वत: कबूल केले होती. त्यामुळे या खुर्चीची किंमत त्यांना अधिक आहे. म्हणूनच त्यांनी फुटबॉल विकासासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे सांगितले. याचाच एक भाग म्हणून चर्चिल २०२०च्या १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा हट्ट करीत आहेत. या स्पर्धेसाठी त्यांनी गोव्याची दावेदारी पुढे केली आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहे, असे झाल्यास फुटबॉलसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरेल. याच वर्षांत जीएफडीसीचे दोन खेळाडू भारतीय प्रशिक्षण शिबिरात निवडल्या गेले.
नेहमीप्रमाणे यंदाही क्रिकेटसाठी हे वर्ष असमाधानकारक राहिले. सचिव देश किनळेकर यांनी जीसीएचा राजीनामा दिला होता. दया पागी यांना सचिवपदाची जबाबदारी मिळाली. त्यांनी प्रयोग करण्याचे प्रयत्न केले. लोढा समितीच्या शिफारशींची अमलबजावणी जीसीएकडून करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या प्रस्तावाच्या फाईल्स पुढे गेल्या. मात्र मैदानावर जीसीएचे संघ विशेष कामगिरी करु शकले नाहीत. रणजी क्रिकेट स्पधेर्त नव्या चेहºयांना संधी दिली खरी मात्र त्यांचा कामगिरीवर परिणाम दिसून आला ‘क’ गटात हा संघ तळात राहिला आणि त्यांना एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. मोहम्मद अझरुद्दिनच्या मुलाला पाहुणा खेळाडू म्हणून संघात घेउन जीसीए टीकेचे धनी ठरली. महिला क्रिकेटमध्ये शिखा पांडे हिला टी-२० विश्वचषकाच्या संघात जागा मिळाली नाही. बंगळूरु येथील शिबिरात सहभागी होउनही संधी न मिळाल्याने शिखा नाराज झाली होती. शिखा हिला यावर्षीचा दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्षांच्या अखेरीस महिला टी-२० संघ जाहीर करण्यात आला. त्यात शिखाचे नाव झळकले. त्यामुळे तिला दिलासा मिळालास असेल. दुसरीकडे, टेनिसबॉल क्रिकेटमध्ये मात्र मुला-मुलींच्या संघांनी राष्ट्रीय जेतेपद पटकावत दिलासा दिला. विजयवाडा येथे झालेल्या २९ वरिष्ठ राष्ट्रीय टेनिसबॉल स्पर्धेत गोव्याच्या मुलींच्या संघाने सुवर्ण तर मुलांनी कांस्यपदक पटकावत वर्षांचा ‘सुवर्ण’ शेवट केला.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख पे तारीख...गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार की नाहीत? असा प्रश्न गेल्या वर्षभरापासून क्रीडाप्रेमींनी उपस्थित केला. कारण दोन वेळा स्पर्धा पुढे ढकलल्याने त्यांच्या मनात शंकेचे वारे कायम आहे. स्पर्धेची तारीख आतातरी पुढे ढकलण्यात येउ नये, अन्यथा राष्ट्रीय पातळीवर गोव्याचे नाव बदनाम होईल. ही चिंता होती. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही स्पर्धा आयोजित करण्याचे ठाणले. मात्र ते अमेरिकेत उपचारासाठी गेल्यापासून स्पर्धेची प्रक्रिया थंडावली. आता केवळ चार-पाच महिन्यात स्पर्धेची संपूर्ण तयारी करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. त्यामुळे पुन्हा तारीख पुढे ढकलण्यात येउ नये, असे क्रीडाप्रेमींना वाटते. भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या बैठकीत स्पर्धेच्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला. यावर आयओएच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी प्रत्यक्षरीत्या कामे पूर्ण होतील की नाही, याबाबतही चर्चा रंगली.
कबड्डीमध्ये यंदाही गोव्याचा प्रज्योत मोरजकर हा चेहरा आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकला. दुबईतील कबड्डी स्पर्धेत त्याला आॅफिसियल म्हणून संधी मिळाली आणि प्रो कबड्डी स्पर्धेतही तो पंच म्हणून कायम होता. या वर्षी गोवा कबड्डी संघटनेच्या लीग स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद लाभला. संघटनेने राष्ट्रीय पातळीवर भोपाळ, ओडिशा येथे संघ पाठवला मात्र त्यांना पुढील फेरीसाठी पात्रता मिळवता आली नाही. संघटनेकडून यंदा ज्युनियर राज्यस्तरीय, तर वास्को, पेडणे येथे वरिष्ठ पातळीवरील निवड चाचणी आणि स्पर्धा भरविण्यात आली. तसेच रुक्मिणी कामत आणि महाबळेश्वर सुर्लीकर यांच्यात निवडणुक दरम्यान झालेला वादही मोठा गाजला. जलतरणासाठी हे वर्ष संमिश्र ठरले. गोव्याचा आघाडीचा डायव्हिंगपटू आल्हाद च्याटी याने आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. तसेच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतही त्याने पदक मिळवून दिले. याशिवाय श्रृंगी बांदेकर, झेव्हियर मायकल डिसोझा, सय्यद इकबाल यांनी चमक दाखवली. गोव्याच्या तीन जलतरणपटूंची खेलो इडिया या पुरस्कारासाठी निवड झाली. समिरा अब्राहम या ट्रायथ्लोनपटूची यंदाच्या जिनो पुरस्कारासाठी निवड झाली. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवणारा स्क्वे मार्शल आर्टस संघाने सांघिक गटात बाजी मारली.