कोलकाता : टी-२० विश्वकप स्पर्धेत दुसऱ्यांदा जेतेपद पटकावल्यामुळे विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमी खूश आहे, पण बोर्डाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना त्याने टीकाकार व डब्ल्यूआयसीबीकडून झालेल्या अपमानाला खेळाडूंनी दिलेले कदाचित हे सर्वोत्तम उत्तर असावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. इंग्लंडचा समालोचक मार्क निकोलसने विंडीज संघाला ‘बुद्धी नसलेला संघ’ म्हटले होते. त्यानंतर विंडीज संघाने रविवारी रात्री इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करीत दुसऱ्यांचा विश्व टी-२० स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. पत्रकार परिषदेत बोलताना सॅमी म्हणाला, ‘‘आम्हाला २०१२मध्ये जेतेपदाची गरज होती. त्या वेळी आम्हाला कुणी दावेदार मानले नव्हते. या वेळीही स्पर्धेपूर्वी पत्रकार व आमच्या क्रिकेट बोर्डाने गरज नसताना आमचा अपमान केला. आम्ही केवळ जेतेपद पटकावूनच त्यांना उत्तर देऊ शकत होतो.’’ सॅमी म्हणाला, ‘‘आम्ही प्रवासाला सुरुवात केली, त्या वेळी आम्ही स्पर्धेत सहभागी होऊ किंवा नाही, याबाबत लोकांमध्ये साशंकता होती. आमच्याकडे अनेक मुद्दे होते. आमच्या बोर्डाने आमचा अपमान केल्याचे शल्य आमच्या मनात होते. मार्क निकोलसने आमच्या संघाला ‘बुद्धी नसलेला संघ’ म्हणून संबोधले होते. स्पर्धेपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे टीम एकसंध झाली. मी कॅरीकोमच्या प्रमुखांचे आभार व्यक्त करतो. त्याने स्पर्धेदरम्यान संघाचे समर्थन केले. आम्हाला ई-मेल मिळाले आणि फोन कॉल्स पण आले. पंतप्रधान किथ मिचेल (ग्रेनाडा) यांचा ई-मेल सकाळी मिळाला, पण अद्याप आमच्या क्रिकेट बोर्डाकडून अभिनंदन करण्यात आलेले नाही हे निराशाजनक आहे.’’डब्ल्यूआयसीबीने सॅमीला फटकारले सेन्ट जोन्स : विश्व टी-२० स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर बोर्डावर टीका करणारा विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने (डब्ल्यूआयसीबी) फटकारले. त्याचसोबत बोर्डाने प्रदीर्घ कालावधीपासून सुरू असलेल्या मानधनाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी खेळाडूंसोबत चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला. विंडीजने जेतेपदाचा मान मिळवल्यानंतर प्रतिक्रिया देताना सॅमीने बोर्डाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तासभराने कॅरेबियन क्रिकेट बोर्डाने सॅमीच्या वक्तव्यावर टिप्पणी करताना ‘डब्ल्यूआयसीबी अध्यक्षांनी विश्व टी-२० स्पर्धेच्या आयोजकांची प्रशंसा केली’ असा मथळा दिला आणि त्यात विंडीजच्या कर्णधाराचे वक्तव्य योग्य नसल्याचे म्हटले होते. डब्ल्यूआयसीबीचे अध्यक्ष डेव्ह कॅमरन यांनी सॅमीच्या तक्रारीची दखल घेतली नाही; पण चाहत्यांच्या गर्दीने फुललेल्या ईडन गार्डनवर कर्णधाराने दिलेल्या प्रतिक्रियेवर आयोजकांची माफी मागितली. >सॅम्युअल्सचे वॉर्नला प्रत्युत्तरकोलकाता : वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज मार्लन सॅम्युअल्सने इंग्लंडविरुद्ध टी-२० विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीतील सामनावीर पुरस्कार शेन वॉर्नला समर्पित केला आणि आॅस्ट्रेलियाच्या या महान फिरकीपटूवर टिप्पणी करताना माईकपेक्षा बॅटने उत्तर देणे आवडत असल्याचे सांगितले. सॅम्युअल्स सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘रविवारी सकाळी जाग आली त्या वेळी माझ्या डोक्यात केवळ एकच बाब होती. शेन वॉर्न सातत्याने बोलत होता आणि मी केवळ वॉर्न हे केवळ तुझ्यासाठी हे सांगण्यास इच्छुक होतो. मी बॅटने उत्तर देतो, माईकवर नाही.’सॅम्युअल्स आणि वॉर्न यांच्यादरम्यानचा वाद भारताविरुद्ध उपांत्य फेरीच्या लढतीदरम्यान पुन्हा एकदा उफाळून आला. त्या वेळी समालोचन करीत असलेल्या वॉर्नने सॅम्युअल्स बाद झाल्यानंतर टिप्पणी केली होती. यापूर्वी २०१३ मध्ये बिग बॅश स्पर्धेदरम्यान या दोघांदरम्यान वाद झाला होता. यंदा कसोटी मालिकेदरम्यानही हा वाद कायम होता. > जानेवारी २०१६ मध्ये आॅस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सहभागी झालो होतो. त्या वेळी वॉर्नसोबत वाद झाला होता. मी त्याचा कधी अपमान केल्याचे आठवत नाही. त्याच्या मनात काहीतरी घोळत असून ते बाहेर काढण्याची गरज आहे, असे मला सातत्याने वाटत होते.’इंग्लंडविरुद्ध अंतिम लढतीत ६६ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ८५ धावांची खेळी केल्यानंतर ‘वॉर्न माझ्याबाबत जे काही बोलतो किंवा जे काही करतो, त्याचे मी समर्थन करू शकत नाही.- मार्लन सॅम्युअल्स सॅम्युअल्सवर दडपण येणार नाही यासाठी प्रयत्नशील होतो : ब्रेथवेटकोलकाता : विश्व टी-२० स्पर्धेत वेस्ट इंडीजच्या विजयात ‘हिरो’ ठरलेल्या ब्रेथवेटने सॅम्युअल्सवर दडपण येऊ नये, यासाठी जोखीम पत्करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ब्रेथवेटन डावातील अखेरच्या षटकात बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकत विंडीजला संस्मरणीय विजय मिळवून दिला. ब्रेथवेट म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास माझ्यावर दडपण होते. एकाग्रता कायम राखण्याचा प्रयत्न केला. मार्लोनवरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव घेऊन सर्व काही त्याच्यावर सोपवणे संयुक्तिक वाटले नाही. जबाबदारी स्वीकारत चौकार, षटकार ठोकणे क्रमप्राप्त होते. नशिबाने त्यात मी यशस्वी ठरलो. > स्टोक्सला सावरण्यास वेळ लागेल : मॉर्गनकोलकाता : आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेच्या अंतिम लढतीत वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या षटकात कार्लोस ब्रेथवेटने सलग चार षटकार ठोकल्यामुळे अष्टपैलू बेन स्टोक्सचे मनोधैर्य ढासळले असून, त्याला सावरण्यासाठी वेळ लागेल, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने व्यक्त केली. विंडीजला अखेरच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती. त्यानंतर ब्रेथवेटने पहिल्या चार चेंडूवर चार षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर स्टोक्स आपले डोके धरून मैदानावर बसला असल्याचे चित्र होते. मॉर्गन म्हणाला, ‘स्टोक्सचे मनौधैर्य ढासळणे स्वाभाविक होते. आगामी काही दिवस त्याचा प्रभाव दिसेल. आम्ही दु:ख वाटून घेतो आणि यश शेअर करतो. आम्ही तुझ्यासोबत आहोत, असे आम्ही त्याला सांगत असलो, तरी सध्या ते त्याच्या कानापर्यंत पोहोचत नाही.’ क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. विंडीजच्या डावादरम्यान जास्तीत जास्त वेळ सामन्यावर आमचे नियंत्रण होते; पण अखेर आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. आमची गोलंदाजी उल्लेखनीय ठरली. विंडीज विजयासमीप नव्हता; पण पराभवाच्या गर्तेत सापडलो आहोत, असा त्यांनी कधीच विचार केला नाही. आम्हाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी मला माझ्या खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान आहे.- इयोन मॉर्गन, इंग्लंड कर्णधार>संघाचा विचार करता गेल, ब्राव्हो, होल्डर, ब्रेथवेट, बेन कुठल्याही दिवशी चमकदार कामगिरी करण्यास सक्षम आहेत. आमच्या संघात १५ मॅच विनर्स आहेत. आम्ही सहज विजय मिळवला तर हा संघ एका खेळाडूचा असल्याचे भासते.- डॅरेन सॅमी, विंडीजचा कर्णधार
अपमानाचे हे सर्वोत्तम उत्तर
By admin | Published: April 05, 2016 12:40 AM