नवी दिल्ली : मयंक अग्रवालच्या (४९ चेंडू, ८७ धावा) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय बोर्ड अध्यक्ष इलेव्हनने टी-२० सराव सामन्यात मंगळवारी दक्षिण आफ्रिका संघाचा ८ गडी राखून पराभव केला. मयंकने चमकदार खेळी करीत प्रदीर्घ कालावधीच्या या दौऱ्यात पाहुण्या संघाच्या विजयाने सुरुवात करण्याच्या इच्छेवर पाणी फेरले.युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय बोर्ड अध्यक्ष इलेव्हन संघाने विजयासाठी आवश्यक १९३ धावा १९.४ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. त्याआधी, जेपी ड्युमिनीच्या ३२ चेंडूंतील ६८ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १८९ धावांची मजल मारली. मयंक व मनन व्होरा यांनी सलामीला केलेली ११९ धावांची भागीदारी भारतीय डावाचे आकर्षण ठरली. मयंकने दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने ४९ चेंडूंमध्ये १२ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ८७ धावांची खेळी केली. प्रदीर्घ कालावधीपासून कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या व्होराने ४२ चेंडूंमध्ये ५६ धावा फटकावल्या. त्यात ८ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. धर्मशाला येथे २ आॅक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या टी-२० सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघासाठी हा एकमेव सराव सामना होता. दक्षिण आफ्रिका संघाला भारताच्या ‘अ’ संघाविरुद्ध लढत द्यावी लागली नाही. ‘अ’ संघ बांगलादेशविरुद्ध बंगळुरूमध्ये अनधिकृत कसोटी सामना खेळण्यात व्यस्त आहे. यजमान संघात युवा भारतीय खेळाडूंचा समावेश होता. आयपीएल आणि लिस्ट ‘अ’ सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या संघात संधी मिळाली. कर्नाटकचा युवा फलंदाज मयंक आणि व्होरा यांच्याव्यतिरिक्त संजू सॅम्सन (नाबाद ३१ धावा, २२ चेंडू) आणि कर्णधार मनदीप सिंग (नाबाद १२) यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने ७ गोलंदाजांचा वापर केला, पण त्यांना छाप सोडता आली नाही. के. रबाडाने ३ षटकांत ३३, ड्युमिनीने २ षटकांत २२ धावा बहाल केल्या. मर्चेंट डि लांगे आणि इम्रान ताहिर महागडे ठरणे कर्णधार प्लेसिससाठी चिंतेचा विषय आहे. त्याआधी, कर्णधार फाफ डू प्लेसिस (४२ धावा, २७ चेंडू) आणि एबी डिव्हिलियर्स (३६ धावा, २७ चेंडू) यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने दमदार मजल मारली.(वृत्तसंस्था)-------------धावफलकदक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स झे. नेगी गो. कुलदीप ३७, क्विंटन डीकॉक धावबाद ०२, फाफ डू प्लेसिस रिटायर्ड हर्ट ४२, जेपी ड्युमिनी नाबाद ६८, डेव्हिड मिलर त्रि. गो. पंड्या १०, फरहान बेहार्डियन नाबाद १७. अवांतर १३. एकूण २० षटकांत ३ बाद १८९. बाद क्रम : १-३, २-९०, ३-१०६. गोलंदाजी : अनुरित ४-०-४९-०, धवन ३-०-३३-०, चहल ४-०-३१-०, नेगी ३-०-२६-०, यादव ४-०-२६-१, पंड्या २-०-१६-१.भारतीय बोर्ड अध्यक्ष इलेव्हन : मनन व्होरा झे. बेहार्डियन त्रि. गो. ड्युमिनी ५६, मयंक अग्रवाल झे. मिलर गो. डीलांगे ८७, संजू सॅम्सन नाबाद ३१, मनदीप सिंग नाबाद १२. अवांतर (७). एकूण : १९.४ षटकांत २ बाद १९३. बाद क्रम : १-११९, २-१७१. गोलंदाजी : एबोट ४-०-४३-०, रबाडा ३-०-३३-०, मॉरिस ३-०-२०-०, डीलांगे २.४-९-२५-१, ताहिर ३-०-२६-०, लेई २-०-२३-०, ड्युमिनी २-०-२२-१.
भारत इलेव्हनची सरशी
By admin | Published: September 29, 2015 11:32 PM