मुंबई : कोणतीही पोझ मारताना एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्थिर राहणारा महाराष्ट्राचा होल्ड मॅन आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रेने 60 किलो वजनी गटात पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करीत आपल्या भारत श्री गटविजेतेपदाची हॅट्ट्रिक केली. नितीनच्या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राने 11 व्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले. तसेच 55, 65 आणि 70 किलो वजनी गटात रेल्वेच्या जे.जे.चकवर्ती, एस. भास्करन आणि अनास हुसेन यांनी बाजी मारून रेल्वेची सुवर्ण गाडी सुसाट असल्याचे दाखवून दिली. त्याचप्रमाणे 90 खेळाडूंचा सहभाग असलेल्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात महाराष्ट्राच्या किरण साठे आणि रोहन पाटणकरला धक्का देत चंदीगडच्या चेतन सैनीने धमाकेदार यश संपादले.
भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेच्या पहिल्या चार गटात रेल्वेने जबरदस्त कामगिरीची नोंद करीत महाराष्ट्राच्या सांघिक विजेतेपदाच्या स्वप्नांमध्ये अडथळे निर्माण केले आहे. 55 किलो वजनी गटात रेल्वेच्या जे.जे. चक्रवर्तीने दिल्लीच्या सोनूला मागे टाकत सोने जिंकले. त्यानंतर 60किलो वजनी गटातही रेल्वेच्याच हरीबाबूचा बोलबाला होता, पण महाराष्ट्राच्या होल्ड मॅन नितीन म्हात्रेने आपल्या अनुभवी, पीळदार आणि सहजगत्या पोझ मारण्याच्या कलेच्या जोरावर बाजी मारली. 65 किलो गटात अनिल गोचीकरला अनपेक्षित धक्का देत एस. भास्करनने रेल्वेला आणखी एक सुवर्ण जिंकून दिले. 70किलो वजनी गटातही रेल्वेच्या अनास हुसेनने करामात करून दाखविली. त्याने पंजाब पोलीसांच्या माजी मि. वर्ल्ड हिरालालला नमवत सुवर्णाला गवसणी घातली.