BHAVANI DEVI IS THE CWG CHAMPION : भारताची स्टार तलवारबाज भवानी देवीने बुधवारी राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद २०२२ स्पर्धेत वरिष्ठ महिला Sabre Individual categoryचे सुवर्णपदक जिंकले. गतविजेत्या भवानीने जेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या व्हेरोनिका व्हॅसिलेव्हाचा १५-१० असा पराभव केला. भवानीने २०१९मध्ये याच क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते आणि हे तिचे राष्ट्रकुल स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले.
लंडनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भवानीला पहिल्या फेरीत बाय मिळाला. दुसऱ्या फेरीत तिने अलेक्झांड्रा डेविहाडचा १५-६ असा पराभव केला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव लौकिक करणाऱ्या भवानीने उपांत्य पेरीत स्कॉटलंडच्या ल्युसी हिघॅमवर १५-५ असा सहज विजय मिळवला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूने कडवी टक्कर दिली. पण, भवानीने दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवलं.
Chadalavada Anandha Sundhararaman Bhavani Devi हे तिचे पूर्ण नाव... वयाच्या १२व्या वर्षी तिनं चेन्नईत पार पडलेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत तलवारबाजीत सुवर्णपदक जिंकले. तामिळनाडूचे हे या क्रीडा प्रकारातील पहिलेच पदक होते. बांबूच्या काठीपासून तिनं तलवारबाजी करण्यास सुरुवात केली. संकटाला तोंड देत तिनं आपलं तलवारबाज बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं, अर्थात या सर्व प्रवासात तिच्या कुटुंबीयांची विशेषतः आईची प्रत्येकवेळी खंबीर साथ मिळाली. तलवारबाजी हा खर्चीक खेळ आहे आणि भवानीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे भवानी बांबुच्या काठीपासून सराव करायची अन् तलवारीचा फक्त स्पर्धेत उपयोग करायची. भवानीला चिअर करण्यासाठी तिची आईही टोकियोत दाखल झाली होती. वयाच्या 14व्या वर्षी तिला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळाली होती, परंतु स्पर्धा ठिकाणी उशीरा पोहोचल्यामुळे तिला ब्लॅक कार्ड दाखवून बाद करण्यात आले. पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणून ती खूप उत्साहात होती.
आयोजकांनी तिला स्टेडियमसाठी सकाळी 7.30 वाजता निघायचं आहे असे सांगितले. पण, प्रवासात आम्हाला उशीर झाला आणि आयोजकांनी मला बसमध्येच तलवारबाजीचे कपडे घालण्यास सांगितले, असे तिने सांगितले. लाजाळू स्वभावाच्या भवानी देवीनं कसेबसे ते कपडे घातले अन् स्टेडियमवर पोहोचली. परंतु त्याआधीच तीनवेळा तिच्या नावाची घोषणा झाली अन् तिला बाद ठरवण्यात आले. त्यानंतर ती संपूर्ण दिवस रडली होती. अशा अनेक वाईट अनुभवांतून भवानी देवी शिकत गेली अन् ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.