नटाडोला बे, फिजी : भारतीय गोल्फर गगनजीत भुल्लर याने अंतिम फेरीत सहा अंडर ६६ च्या शानदार स्कोअरसह फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावले आहे. हे त्याचे युरोपीय टीमवरील पहिले जेतेपद आहे.तीस वर्षांचा भुल्लर यासोबत आशियाई टूरवरील भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू बनला. तसेच तो आॅस्ट्रेलिया टूरवर विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय आहे. आशियाई टूरवर त्याचा नववा विजय आहे आणि एकूण दहावे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. भुल्लर याने अंतिम फेरीत पाच बर्डी, एक ईगल आणि एक बोगी केली. त्याचा स्कोअर सहा अंडर होता. त्याचा एकूण स्कोअर १४ अंंडर २७४ राहिला. भुल्लर याने आॅस्ट्रेलियाच्या अँथोनी क्वेलला एका शॉटने मागे टाकले त्याने अंतिम फेरीत ९ अंडर ६३ चे कार्ड खेळले.दक्षिण आफ्रिकेचा अर्नी एल्स (६५) आणि आॅस्ट्रेलियाचा बेन कॅम्पबेल (६६) संयुक्त तिसऱ्या स्थानावर राहिले. भारताच्या अजितेश संधू याने अंतिम फेरी ७१ च्या स्कोअरसह संयुक्त ४३ वे स्थान पटकावले.