चेन्नई : भारताचा अनुभवी टेनिसपटू महेश भूपतीसह साकेत मायनेनी, जीवन नेदुनचेझियान आणि श्रीराम बालाजी या खेळाडूंना चेन्नई ओपनमध्ये दुहेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे़ या स्पर्धेत स्वीत्झर्लंडचा स्टार खेळाडू स्टेनिसलास वावरिंका मुख्य आकर्षण ठरणार आहे़ चेन्नई ओपनमध्ये एकेरीत भारताचा स्टार खेळाडू सोमदेव देववर्मन आणि रामकुमार रामनाथन यांना वाईल्ड कार्ड मिळणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे़ चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत या वेळेस भारताच्या आघाडीच्या खेळाडूंसह जागतिक क्रमवारीत अव्वल २५ टेनिसपटूंत समावेश असलेल्या चार आणि २०१४ एटीपी विश्व टूर पुरस्कार विजेत्या तीन खेळाडूंना बघण्याची संधी मिळणार आहे़ भारताचा दुहेरीतील अव्वल खेळाडू भूपती चेन्नई ओपनमध्ये पहिल्यांदाच २७ वर्षीय साकेतसोबत जोडी बनविणार आहे़ याचबरोबर भूपती मार्च २०१४ नंतर टेनिस कोर्टवर कमबॅक करेल़ भूपतीने आपल्या कारकिर्दीत एकूण ५२ किताब मिळविले आहेत़ दुसरीकडे साकेत याने गत महिन्यात दुहेरी क्रमवारीत १५४ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे़ त्याने २०१४ मध्ये डेव्हिस कपमध्ये भारताकडून पदार्पण केले होते़ तेव्हा त्याने रोहन बोपन्नासह जोडी बनविली होती़ तमिळनाडूचा बालाजी आणि नेदुनचेझियान यांना तमिळनाडू टेनिस संघटनेचा पाठिंबा आहे़ ते चेन्नई ओपनमध्ये तिसऱ्यांदा आपले नशीब अजमावणार आहेत़ जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला गत विजेता स्वीत्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिंका, १४व्या स्थानावर असलेला स्पेनचा फेलिसियानो लोपेज आणि रोबर्टो बातिस्ता आगुत (स्पेन) आणि बेल्जियम डेव्हिड गोफिन हे अनुभवी खेळाडूसुद्धा स्पर्धेत आपले नशीब अजमावणार आहेत़ (वृत्तसंस्था)
भूपती, साकेत, जीवन, श्रीरामला वाईल्ड कार्ड
By admin | Published: December 23, 2014 2:04 AM