बंगळुरु : अनुभवी दिग्गज खेळाडू लिएंडर पेस याला २७ वर्षांत पहिल्यांदा भारतीय टेनिस संघाबाहेर पडावे लागले आहे. बिगर खेळाडू कर्णधार महेश भूपती याने स्वत:चा ‘दम’ वापरून उझबेकिस्तानविरुद्ध आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आशिया ओसियाना लढतीसाठी पेसला बाहेरचा रस्ता दाखवित रोहन बोपन्नाला संघात स्थान दिले.विश्व रँकिंगमध्ये बोपन्ना २४ व्या तर आॅलिम्पिक कांस्य विजेता आणि अनेक ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी पेस ५३ व्या स्थानावर आहे. यूकी भांबरीचे स्थान रामकुमार रामनाथन घेईल. बोपन्ना दुहेरीत श्रीराम बालाजीसोबत जोडी बनविणार आहे.पेसने १९९०मध्ये जयपूर येथे जपानविरुद्ध डेव्हिस चषक संघात पदार्पण केले. तेव्हापासून जवळपास तीन दशके खेळल्यानंतर फॉर्मचे कारण देत बाहेर करण्यात आले. त्याने डेव्हिस चषकाचे ४२ सामने जिंकून इटलीच्या निको पीटरांजेलीच्या विक्रमाची बरोबरी केली. सर्वाधिक दुहेरी लढती जिंकण्याच्या विक्रमापासून तो केवळ एक सामना दूर आहे. पेसला बाहेर करीत बोपन्नाला स्थान देण्याचे समर्थन केले. तो म्हणाला, ‘बंगळुरुचा स्थानिक खेळाडू असलेला बोपन्ना चांगली सर्व्हिस करतो. मोसमाची सुरुवातही त्याने झकास केली. कोर्टवर जलद खेळ होणार असल्याने रोहनला स्थान देण्यात आले. हाच निवडीचा आधार होता.’पेसची कारकीर्द संपली असे मानायचे का, असा सवाल करताना भूपतीने नकारात्मक उत्तर दिले. तो म्हणाला, ‘मुळीच नाही. पेससह कुणाचीही कारकीर्द संपलेली नाही, असे मी स्पष्ट केले आहे. पेसची संघातील उपस्थिती महत्त्वाची आहे. त्याच्यातील अनुभव आणि ऊर्जा दोन्ही शानदार गोष्टी आहेत.’ (वृत्तसंस्था)>संबंध विच्छेदामुळे महेशने सूड उगवला : पेसमहेशसोबतचे संबंध बिघडल्याने निवड प्रक्रियेचे उल्लंघन करीत महेशने संघाबाहेर केल्याचा आरोप दुखावलेल्या लिएंडर पेसने केला. तो म्हणाला, ‘निवडीचा आधार ‘फॉर्म’ असेल तर मी चांगल्या तऱ्हेने बॉल हिट करीत होतो. संघ निवडणे हा भूपतीचा अधिकार आहे. पण निवडीत असा पक्षपात होऊ नये. कधीकाळी निवड रँकिंगच्या आधारे व्हायची. आज ती वैयक्तिक पसंतीच्या आधारे होत आहे. मला मेक्सिकोतून केवळ संघाबाहेर करण्यासाठी बोलविण्यात आले. असे करायचे होते तर फोनवरदेखील तुझी गरज नाही, हे सोप्या शब्दात सहजपणे सांगता आले असते. माझा हा अपमान आहे. राष्ट्रध्वज, देश आणि लोकांप्रती माझे प्रेम नि:स्वार्थी आहे. यामुळेच मी मेक्सिकोतून येथे आलो.’>पेसला वगळण्याची पद्धत चुकीची : मुखर्जीलिएंडरला संघातून वगळण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगून माजी कर्णधार जयदीप मुखर्जी म्हणाले, ‘पेस युवा खेळाडू नसल्याने कधी ना कधी संघाबाहेर होणार होताच, पण त्याला काढण्याची पद्धत चुकीची आहे. महेशने संघ निवडीपूर्वी एआयटीएच्या माध्यमातून अनधिकृतपणे संकेत द्यायला हवे होते. ’
भूपतीने पेसला दाखविला ‘बाहेरचा रस्ता’
By admin | Published: April 07, 2017 3:48 AM