नवी दिल्ली : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुड्डा यांची सून आणि माजी खासदार दीपेंद्र हुड्डा यांची पत्नी श्वेता हुड्डा यांनी घोडेस्वारीत इतिहास रचला आहे.
दिल्लीत 2 नोव्हेंबरला झालेल्या जागतिक घोडेस्वारी चॅम्पियनशिपमध्ये श्वेता हुड्डा यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. या चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 62.426 पॉईंट मिळविले आहेत. या टुर्नामेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या श्वेता हुड्डा या पहिल्या भारतीय महिला आहेत. या टुर्नामेंटमध्ये एकूण 50 देशांतील घोडेस्वार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
एफईआयकडून आयोजित चॅम्पियनशिपमध्ये श्वेता हुड्डा यांनी प्रतिस्पर्धी एमएस राठोड (62.353) यांचा 73 अंकानी पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर श्वेता हुड्डा यांनी महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,"महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. जर त्यांना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात आपली ओळख निर्माण करु शकतात."
श्वेता हुड्डा या राजकीय घराण्यातील आहेत. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुड्डा हे श्वेता हुड्डा यांचे सासरे आहेत. तर पती दीपेंद्र हुड्डा हे माजी खासदार होते. श्वेता हुड्डा यांना लहानपणापासून घोडेस्वारीची आवड आहे. त्यांच्याजवळ एक स्वत:चा घोडा सुद्धा आहे. विशेष म्हणजे स्पोर्ट्सची आवड असणाऱ्या श्वेता हुड्डा या सामाजिक क्षेत्रातही कार्य करताना दिसून येतात.
इतर टुर्नामेंटमधील श्वेता हुड्डा यांची कामगिरी- 2019 मध्ये वर्ल्ड चॅलेंज ड्रेसेसमध्ये सुवर्ण पदक- 2018 मध्ये सीनिअर वर्ल्ड चॅलेंज ड्रेसेस रिल्पेमध्ये रौप्य पदक- 2018 मध्ये 2 राष्ट्रीय सुवर्ण पदकं- 2014 मध्ये राष्ट्रीय सुवर्ण पदक